*श्रीरामसागर जलाशयातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग; सिरोंचा तालुक्यात पूरस्थितीची शक्यता*
*जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश*

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:हा29 सप्टेंबर 2025
तेलंगणातील श्रीरामसागर जलाशयातून सुमारे 13 लाख क्युसेक पाणी सोडण्यात येणार असून सध्या 10 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी गोदावरी नदीतून पुढील पाच ते सहा तासांत गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात पोहोचण्याची शक्यता असल्याने तेथील नदीकाठच्या गावांना पूरस्थितीचा धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी तातडीने आढावा बैठक घेवून सिरोंचा तालुक्यातील यंत्रणेने नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर व गरजेप्रमाणे नागरिकांना शेल्टरहोम मध्ये ठेवण्याचे तसेच आरोग्य सुविधा व एसडीआरएफ पथके तैनात ठेवणे आदींबाबत सर्व विभागांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकारी पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे उपस्थित होते. तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि संबंधित विभागांचे अधिकारी सहभागी झाले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की श्रीरामसागर प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने सिरोंचा तालुक्यातील नदीकाठच्या गावे धोक्याच्या क्षेत्रात येऊ शकतात. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहून खालील महत्त्वाच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात.
*नागरिकांचे स्थलांतर*
नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना दवंडी देऊन सतर्क करणे व आवश्यकतेनुसार त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले. यासाठी महसूल, पोलीस व वनविभागाने परस्पर समन्वय साधावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
*एसडीआरएफ पथके सज्ज*
आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी एसडीआरएफ पथके सिरोंचा तालुक्यात तैनात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भामरागड मुख्यालयात असलेले पथकही तातडीने सिरोंचा तहसीलमध्ये हलविण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
*अफवांवर नियंत्रण*
पाण्याचा विसर्ग रात्रीच्या वेळी होणार असल्याने नागरिकांमध्ये भीती किंवा गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहून अफवांवर नियंत्रण ठेवावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
*आरोग्य विभागाची तयारी*
पूरस्थितीनंतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आरोग्य विभागाने ब्लिचिंग पावडर व औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, तसेच शेल्टर होममध्ये आरोग्य सुविधा तत्पर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी पंडा यांनी सर्व विभागांना समन्वयाने काम करून नागरिकांचे प्राण व मालमत्ता सुरक्षित ठेवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे.