*नैसर्गिक शेतीसाठी ५४ ‘कृषी सखी’ सज्ज! जिल्ह्यात २७ क्लस्टरमध्ये प्रसार सुरू*
राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत पाच दिवसीय प्रशिक्षण संपन्न*

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-21/11/2025
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या आणि जमिनीचे आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत आत्मा कार्यालय यांच्या वतीने कृषी विज्ञान केंद्र येथे ५४ कृषी सखींसाठी पाच दिवसीय विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणातून तयार झालेल्या कृषी सखी आता गावपातळीवर नैसर्गिक शेतीचा प्रचार आणि प्रसार करणार आहेत.
*प्रशिक्षणात मिळाले सखोल मार्गदर्शन*
पाच दिवसांच्या या सखोल प्रशिक्षणात कृषी सखींना नैसर्गिक शेतीची ओळख, तिचे महत्त्व आणि अंमलबजावणीच्या विविध पद्धतींवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणाचा मुख्य भर हा कमी खर्चात उत्पादकता वाढवणाऱ्या नैसर्गिक निविष्ठा तयार करण्यावर होता. यामध्ये, जीवामृत, बीजामृत आणि दशपर्णी अर्क यांसारखे महत्त्वाचे घटक कमी खर्चात कसे तयार करायचे, याबाबत प्रात्यक्षिकांसह सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जमिनीचे आरोग्य सुधारून उत्पादकता वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
*५४ कृषी सखींवर जबाबदारी*
जिल्ह्यात नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत एकूण ५४ कृषी सखींची निवड करण्यात आली असून, नैसर्गिक शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्याची महत्त्वाची जबाबदारी या महिलांवर सोपवण्यात आली आहे. या कामाच्या मोबदल्यात कृषी सखींना मासिक मानधन दिले जाते, तसेच जनजागृती आणि माहितीच्या प्रसारासाठी त्यांना मोबाईल डेटासाठी देखील विशेष मानधन उपलब्ध करून दिले जाते. प्रशिक्षणानंतर सर्व महिलांनी गावोगावी जाऊन नैसर्गिक शेतीचा प्रचार करावा असे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर यांनी यावेळी केले.
*जिल्ह्यात २७ क्लस्टरमध्ये अंमलबजावणी*
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत जिल्ह्यात एकूण २७ क्लस्टरची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक क्लस्टर ५० हेक्टर क्षेत्राचे असून, या संपूर्ण १३५० हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक क्लस्टरमध्ये दोन कृषी सखी काम करत आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून या कृषी सखींच्या मदतीने सध्या नैसर्गिक शेती संदर्भात जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. सुरुवातीला प्रशिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती करून, नंतर शेतकऱ्यांच्या शेतीचे नैसर्गिक शेतीत रूपांतरण करण्याचा मानस कृषी विभागाने व्यक्त केला आहे.



