उभ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला दुचाकीची भीषण धडक; आठ वर्षीय शौर्यचा जागीच मृत्यू – रक्षाबंधनाचा दिवस काळा ठरला अंकिसा गावात घडली हृदयद्रावक दुर्घटना; वडिलांचा हात-पाय मोडला, आई किरकोळ जखमी

सिरोंचा विदर्भ न्यूज २४ नेटवर्क दिनांक:-09/08/2025
रक्षाबंधनासारख्या आनंददायी आणि भावनिक सणाच्या दिवशीच एका कुटुंबावर शोककळा ओढवली. गडचिरोली तालुक्यातील अंकिसा गावात झालेल्या भीषण अपघातात शौर्य संतोष कोक्कू (वय ८) या निरागस बालकाचा जागीच मृत्यू झाला. त्याचे वडील संतोष रामलू कोकू (वय ४३) यांचा डावा हात व पाय मोडून ते गंभीर जखमी झाले असून, आई सौंदर्या कोक्कू यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
ही दुर्घटना आज शनिवार सकाळी 11 वाजता सुमारात घडली. असरअल्ली येथील कोक्कू कुटुंब आपल्या नातेवाईकांकडे, बहिणीला राखी बांधण्यासाठी, दुचाकीने सिरोंचा दिशेने निघाले होते. मात्र अंकिसा गावाजवळ पोहोचताच रस्त्याच्या कडेला निष्काळजीपणे उभी असलेल्या रामकृष्ण चिरला यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला त्यांच्या दुचाकीची भीषण धडक बसली. अरुंद मार्ग, उभी केलेली ट्रॉली आणि वेळीच दिसून न आल्याने ही घटना घडली.
धडकेचा जोर इतका होता की, शौर्यचा जागीच मृत्यू झाला. संतोष कोक्कू यांना सिरोंचा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने तेलंगणातील वारंगल येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. आई सौंदर्या कोकू यांच्यावर स्थानिक पातळीवर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. “रस्त्यावर अतिक्रमण करून व निष्काळजीपणे वाहनं उभी करणाऱ्या वाहनचालकांवर प्रशासन कठोर कारवाई करत नाही. त्यामुळे अशा घटना घडत राहतात,” असा आरोप ग्रामस्थांनी केला. या संदर्भात ग्रामस्थांनी पूर्वीही प्रशासनाकडे तक्रारी दिल्या असल्याचे सांगण्यात आले, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे स्थानिकांनी म्हटले.
सिरोंचा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.रक्षाबंधनाच्या दिवशीच एका कुटुंबाचा संसार उध्वस्त करणारी ही दुर्घटना संपूर्ण परिसराला हळहळून टाकणारी ठरली आहे.