ब्रेकिंग न्यूज…आजपासून राज्यात लागू होऊ शकते निवडणुकीची आचारसंहिता!
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची आज पत्रकार परिषद; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता

मुंबई विशेष प्रतिनिधी दिनांक:- 4 नोव्हेंबर2025
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होत असून आजपासूनच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे हे आज मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता सचिवालयातील जिमखाना येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकांची अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांविषयी प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. काही ठिकाणी मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून निवडणूक कार्यक्रम घोषित होताच निवडणुकीची आचारसंहिता तात्काळ लागू होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सहायक आयुक्त (जनसंपर्क) डॉ. जगदीश मोरे यांनी पाठवलेल्या अधिकृत पत्रानुसार, आजच्या पत्रकार परिषदेला वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर अनेक ठिकाणी विकासकामांच्या उद्घाटनांचे कार्यक्रम सुरू असताना, आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे सर्व कार्यक्रम स्थगित राहतील. त्यामुळे शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे अधिकारी सतर्क झाले आहेत.
राज्यभरातील नागरिक, उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागले आहे. आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता लागू होईल आणि राज्यात निवडणुकीचे वातावरण अधिकृतपणे सुरू होईल, अशी सर्वसाधारण अपेक्षा आहे.
—
प्रतिनिधी — विदर्भ न्यूज 24 नेटवर्क, मुंबई.



