मुंबई विशेष प्रतिनिधी दिनांक 25 फेब्रुवारी 2026
महाराष्ट्र विधानमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वातावरण तापले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या मागणीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत जोरदार भूमिका मांडली. सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्याच्या निषेधार्थ त्यांनी मंत्रोच्चार करत सभागृहातून बहिर्गमन केले.
धान उत्पादक शेतकरी आधीच निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देत असून, उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, त्या तुलनेत मिळणारा हमीभाव अपुरा ठरत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने धान खरेदीवर बोनस जाहीर करावा, ही रास्त मागणी असल्याचे मुनगंटीवार यांनी ठामपणे मांडले.
विधानसभेत बोलताना त्यांनी सांगितले की, “धान उत्पादक शेतकरी महाराष्ट्राच्या शेतीचा कणा आहेत. त्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. सरकारने तातडीने बोनस जाहीर न केल्यास ही लढाई रस्त्यावर जाईल.” यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मंत्रोच्चार सुरू केला. यामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
सरकारकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर आ. मुनगंटीवार यांनी सभागृहातून बहिर्गमन करत आपला निषेध नोंदवला. त्यांच्या या भूमिकेला विरोधी बाकांतील काही सदस्यांनीही पाठिंबा दर्शवला.
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसचा प्रश्न आता केवळ आर्थिक नसून राजकीय मुद्दा बनत चालला आहे. सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
