अनेक प्रश्नांवर गाजला पंचायत समितीचा वार्षिक आमसभा — डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

सिरोंचा प्रतिनिधी / विदर्भ न्यूज 24/दिनांक:04/10/2025
सिरोंचा – पंचायत समिती सिरोंचा यांच्या वतीने वार्षिक आमसभेचे आयोजन शनिवार, दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी क्रीडा संकुलाच्या प्रांगणात करण्यात आले. या सभेचे अध्यक्षस्थान माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार, अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय नेते डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी भूषवले.
या प्रसंगी सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम, तहसीलदार निलेश होनमोरे, गटविकास अधिकारी सुखीराम कस्तुरे, पोलीस निरीक्षक निखिल फटिंग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कन्नाके, तालुका कृषी अधिकारी विकास, गटशिक्षणाधिकारी दोंतुलवार, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती सतीश गंजीवार, उपसभापती रिकाकूला कृष्णमूर्ती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, नगर पंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा, नगरसेवक सतीश भोगे, सतीश राचर्लावार तसेच आरडा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बापन्ना रंगूवार, सोशल मीडिया प्रमुख नागभूषण चकिनारपवार, ओमप्रकाश ताटीकोंडावार , शहराध्यक्ष रवी सुलतान,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी पंचायत समितीच्या वार्षिक कामकाजाचे विवरण गटविकास अधिकारी सुखीराम कस्तुरे यांनी सादर केले. या अहवालात शिक्षण, आरोग्य, शेती, ग्रामविकास, रोजगार हमी योजना आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “शासनाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हेच आमचे ध्येय आहे. नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.”
या आमसभेत शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत, आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता, शेतीसाठी आवश्यक सिंचन सुविधा, ग्रामपंचायतींच्या निधीअभावी अडथळे, तसेच ग्रामीण भागात आरोग्य आणि स्वच्छता अभियानाची गती वाढवण्याची गरज अशा अनेक प्रश्नांवर चर्चा झाली.
सदस्य व नागरिकांनी ग्रामविकासासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली. गटविकास अधिकारी आणि संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सूचनांची नोंद घेत समस्यांवर शक्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
सभेला पंचायत समिती सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामविकास आणि जनसहभाग या दोन स्तंभांवर सिरोंचा तालुक्याचा विकास अधिक गतीमान होईल, असा विश्वास या आमसभेत व्यक्त करण्यात आला.
— संदीप राचर्लावार, विदर्भ न्यूज 24, सिरोंचा