गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाचे ऐतिहासिक यश:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

गडचिरोली/मुंबई, विशेष प्रतिनिधी दिनांक:-30/07/2025 गडचिरोली जिल्ह्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारण क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती झाली आहे. अल्प कालावधीत विक्रमी जलसाठा निर्माण करत गडचिरोलीने संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श निर्माण केला आहे. यावर्षी पावसाळा २० दिवस आधी सुरू झाल्याने कामाचा कालावधी कमी झाला, तरीही जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी समन्वय आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे मोठे यश मिळाले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामगिरीचे कौतुक करत म्हटले की, गडचिरोली जिल्ह्याने जलसंधारण क्षेत्रात जे यश मिळवले आहे, ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. ही केवळ आकडेवारी नाही, तर ग्रामीण भागातील जलसुरक्षेच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील ९७ गावांमध्ये जलसाठे उभारले गेले असून एकट्या २०२५-२६ या वर्षात ६४.५ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात आली. यामुळे हजारो नागरिकांना पाण्याची उपलब्धता निश्चित झाली आहे. विशेष बाब म्हणजे याच वर्षात तब्बल ६,४४,६०१ घनमीटर गाळ काढून टाकण्यात आला, जो मागील दोन वर्षांच्या एकत्रित कामगिरीपेक्षा आठपट अधिक आहे. या कामांमध्ये विविध सामाजिक संस्था, संघटना यांचेही महत्त्वाचे योगदान आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, या कामगिरीत जिल्हा प्रशासन अर्थात गडचिरोली जिल्हाधिकारी यांचा मोठा सहभाग आहे. या वरुन असे लक्षात येते की, जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायती, स्थानिक यंत्रणा आणि जनतेने एकत्रितपणे काम केल्यास कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही. गडचिरोलीने दाखवून दिले आहे की नियोजनबद्ध पद्धतीने आणि तांत्रिक मार्गदर्शनाने जलसुरक्षेसाठी मोठी उडी घेता येते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या यशस्वी मॉडेलचा अभ्यास करून संपूर्ण राज्यात अशा उपक्रमांची अंमलबजावणी केली जाईल. जलसंधारणाच्या माध्यमातून शेती, जनजीवन आणि पर्यावरण यांना स्थैर्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
00000000