अवैध रेती उत्खननावर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा बडगा; मंडळ अधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारावर कारवाईची शिफारस…

गडचिरोली विदर्भ न्यूज 24 विशेष प्रतिनिधी दिनांक:– 16 ऑगस्ट 2025
गडचिरोली, दि. 16 ऑक्टोबर 2025 : सिरोंचा तालुक्यातील अवैध रेती उत्खनन आणि गौण खनिज वाहतुकीच्या प्रकरणी महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कठोर कारवाई केली आहे. या कारवाईत मंडळ अधिकारी राजू गणपतराव खोब्रागडे आणि तलाठी कु. अश्विनी सडमेक यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले असून, तहसीलदार निलेश होनमोरे यांच्यावर निष्काळजीपणाबद्दल कारवाई करून बदलीची शिफारस विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांच्याकडे करण्यात आली आहे.
▶ अवैध रेती उत्खननाचा मोठा साठा उघड
सिरोंचा तालुक्यातील रेतीघाटांवर वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू असल्याच्या तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक माध्यमांतून आणि नागरिकांकडून वारंवार जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त होत होत्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी, अहेरी यांना चौकशीचे आदेश दिले.
या आदेशानुसार 2 ऑक्टोबर रोजी मौजा मद्दीकुंठा आणि चिंतरेवला येथील रेतीघाटांवर मौके तपासणी करण्यात आली. या चौकशीत तब्बल १५,६६५ ब्रास अवैध रेतीचा साठा आढळून आला. या रेतीसाठी अंदाजे २९ कोटी रुपयांचा दंड प्रस्तावित करण्यात आला असून, रेती उत्खननासाठी वापरलेली २ जेसीबी, १ पोकलँड मशिन आणि ५ ट्रक जप्त करण्यात आले आहेत.
▶ महसूल कर्मचाऱ्यांची निष्क्रियता उघडकीस
चौकशी अहवालानुसार महसूल विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात अपेक्षित निरीक्षण आणि नियंत्रण ठेवण्यात गंभीर निष्काळजीपणा दाखविला.
तलाठी कु. अश्विनी सडमेक यांनी आपल्या हद्दीतील रेतीघाटांची नियमित पाहणी न करता वरिष्ठांना अहवाल न सादर केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.
मंडळ अधिकारी राजू गणपतराव खोब्रागडे यांनी देखील रेती उत्खननावर देखरेख ठेवण्यात कसूर केल्याचे निष्पन्न झाले.
या दोघांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी १५ ऑक्टोबर रोजी निलंबित केल्याचे आदेश जारी केले.
▶ तहसीलदारांवरही कारवाईची शिफारस
या प्रकरणात नियंत्रण ठेवण्यात तहसीलदार निलेश होनमोरे यांच्याकडून अपेक्षित दक्षता न घेतल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच, त्यांच्या बदलीची आणि शिस्तभंग कारवाईची शिफारस विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
▶ “निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही” – जिल्हाधिकारी
अवैध रेती उत्खननासंबंधी महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, कोणताही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असा कडक इशारा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला आहे. जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी वाळूघाटांवर नियमित पाहणी करून, कोणत्याही बेकायदेशीर उत्खननाची माहिती तातडीने वरिष्ठांना देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
▶ प्रशासनाचा संदेश
या कारवाईनंतर महसूल विभागात मोठी खळबळ माजली असून, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या या धडाकेबाज निर्णयामुळे भविष्यात अवैध रेती उत्खननावर आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



