# गडचिरोली भाजपात मोठी खळबळ! भाजपाचे ज्येष्ठ नेते रवी ओलालवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; जिल्ह्यातील राजकारणात उडाली मोठी धूम – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हाताज्या घडामोडी

गडचिरोली भाजपात मोठी खळबळ! भाजपाचे ज्येष्ठ नेते रवी ओलालवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; जिल्ह्यातील राजकारणात उडाली मोठी धूम

सिरोंचा संदीप राचर्लावार. राजकीय विश्लेषण                         दिनांक:-14 नोव्हेंबर 2025

गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय विश्वात आज प्रचंड गडबड उडाली आहे. मागील अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीमध्ये वरिष्ठ पदांवर काम करत, जिल्ह्यामध्ये आपली ठोस ओळख निर्माण केलेले, तसेच जिल्हाध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार म्हणून भक्कम प्रतिमा असलेले रवींद्र (रवी) भाऊ ओलालवार यांनी अखेर भाजपाचा झेंडा खाली करून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला आहे. अहेरीचे आमदार आणि माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे अहेरी–सिरोंचा तालुका तसेच संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर भाजपाचा एक मोठा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोरात होती. या चर्चेची पुष्टी आज प्रत्यक्षदर्शी घटना घडून झाली. भाजपात गेल्या वीस वर्षांपासून सक्रिय असलेला आणि विविध पदांवर जबाबदारी सांभाळणारा एक प्रभावी नेता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतो ही घटना स्वतःतच मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.

रवी ओलालवार यांनी अनेक वर्षे गडचिरोली जिल्हा परिषदेवर काम केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात विविध विकासकामांची अंमलबजावणी केली होती. त्यांच्या कार्यकाळाची छाप आजही अनेक गावांमध्ये दिसते. जिल्हा परिषदेनंतर ते पुन्हा भाजपाच्या संघटनात सक्रिय झाले आणि सलग तीन वेळा जिल्हा महामंत्री पद त्यांनी भूषवले. त्यानंतर दहा–बारा वर्षे ते अहेरी विधानसभा प्रभारी म्हणून काम करत राहिले. या काळात अहेरी तालुक्यातील ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांशी त्यांची जुळलेली नाळ अधिक मजबूत झाली.

 गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी युती धर्म पाळत आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रचारासाठी जीवाचे रान केले होते. त्यांनी धुवांधार नियोजन, बूथ पातळीवर कार्यकर्त्यांची उभी केलेली फौज आणि मतदारांपर्यंत केलेली पोहोच यामुळे अहेरी मतदारसंघातील निवडणूक प्रचाराला वेग आला होता. मात्र, त्या निवडणुकीनंतर पक्षात त्यांची प्रतिमा आणि प्रभाव कमी होत असल्याची चर्चा सुरू झाली.

2022 मध्ये भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी रवी ओलालवार यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते. अनेक कार्यकर्ते त्यांना जिल्हाध्यक्ष बघण्यास उत्सुक होते. अहेरी, सिरोंचा, धानोरा पट्ट्यात त्यांचा प्रभाव प्रचंड असल्याने ते जिल्हाध्यक्ष होणार असल्याच्या चर्चा महिन्यांभर सुरु होत्या. पण अचानक शेवटच्या क्षणी जिल्हाध्यक्ष पद इतर एका ओबीसी समाजातील कार्यकर्त्याकडे गेले. या निर्णयामुळे रवी ओलालवार यांच्या नाराजीची सुरुवात झाली होती. कार्यकर्त्यांमध्येही या निर्णयाला मोठी चर्चा मिळाली होती.

 त्या घटनेनंतर पक्षातील काही गटांकडून त्यांना सतत दुय्यम वागणूक मिळत असल्याची स्थानिक पातळीवरील चर्चा वाढत गेली. अहेरी मतदारसंघात मोठी पकड असलेल्या रवी ओलालवार यांना अपेक्षित भूमिका आणि मान्यता न मिळाल्यामुळे त्यांचा पक्षावरील विश्वास हळूहळू कमी होऊ लागला. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट)त्यांना आदर, स्थान आणि जबाबदारीची ग्वाही देण्यात आली. हाच घटक निर्णायक ठरला आणि आज त्यांनी अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट)प्रवेश केला.

अहेरी–सिरोंचामधील त्यांची पकड पाहता आगामी निवडणुकीत हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा फायदा ठरणार यात शंका नाही. अहेरीत रवी ओलालवार यांची गावोगावी मजबूत ओळख असून, आदिवासी समाजात त्यांची चांगली प्रतिमा आहे. त्यांच्या प्रवेशामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते राष्ट्रवादीकडे वळण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रवेश सोहळ्यात बोलताना रवी ओलालवार यांचे मनापासून स्वागत केले. “अहेरी आणि गडचिरोली जिल्ह्यातील विकासाला गती देण्यासाठी अशा समर्पित आणि अनुभवी कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. रवी यांच्यासारखे नेतृत्त्व मिळणे हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले.

 रवी ओलालवार यांनीही पक्षांतराचा निर्णय भावनिक नसल्याचे स्पष्ट करत सांगितले की, “स्थानिक प्रश्नांना न्याय, आदिवासी समाजाचे हित आणि विकासाची दिशा — हेच माझे ध्येय आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत ही ध्येये अधिक प्रभावीपणे साध्य होतील,” असे त्यांनी भाषणात नमूद केले.

दरम्यान, भाजपामध्ये दीर्घ काळापासून अंतर्गत नाराजी सुरू असून, अहेरी–सिरोंचा मतदारसंघात “पक्षातील आउटगोइंग” वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रवी ओलालवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत जिल्ह्यातील अनेक माजी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेशासाठी सज्ज असल्याची चर्चा वेग घेऊ लागली आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर भाजपाला येणाऱ्या निवडणुकांत मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे.

आजचा हा प्रवेश फक्त एका नेत्याचा पक्षांतर नसून गडचिरोलीतील आगामी राजकारणात मोठे परिवर्तन घडवणारा ‘टर्निंग पॉइंट’ ठरू शकतो. अहेरी–सिरोंचा भागात नवीन समीकरणे तयार होण्यास सुरुवात झाली असून भाजपाचे स्थान कमजोर होण्याची चिन्हे अधिक स्पष्ट दिसत आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय वातावरण आजच्या दिवसापासूनच तापले असून, पुढील काही दिवसांत या घडामोडींना आणखी वेग येणार हे निश्चित.

विदर्भ  न्यूज 24 नेटवर्क

सत्य, तत्पर आणि निर्भीड पत्रकारितेची परंपरा कायम!

 

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!