# कसमसूर क्षेत्रातील नागरिकांचा विजेच्या प्रश्नावर संताप… – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हा

कसमसूर क्षेत्रातील नागरिकांचा विजेच्या प्रश्नावर संताप…

मंजूर झालेल्या 33 केव्ही सब-स्टेशनचे काम तातडीने सुरू करावे – नागरिकांची मागणी राजे अंब्रीशराव आत्राम यांना निवेदन सादर, लवकरच काम पूर्ण होईल असे दिले आश्वासन

अहेरी विशेष प्रतिनिधी दिनांक:–03 सप्टेंबर 2025

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसमसूर क्षेत्रातील नागरिकांनी वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या पुरवठ्यामुळे आणि कमी दाबाच्या समस्येमुळे मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर मंजूर झालेल्या 33 केव्ही सब-स्टेशनचे काम तातडीने सुरू करून पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांना निवेदन देण्यात आले.

शेतकरी, विद्यार्थी आणि लघुउद्योगांना मोठा फटका

कसमसूर क्षेत्रातील जवळपास ७० गावांना विजेच्या समस्येमुळे दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबामुळे मोटारी बंद पडणे यामुळे शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी देणे अशक्य झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून, घरगुती वापर तसेच लघुउद्योगही ठप्प पडत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपूर्वी शासनाने 33 केव्ही सब-स्टेशनला मंजुरी दिली असली तरी अद्याप प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही, हीच सर्वात मोठी समस्या आहे.

कसमसूर ग्रामपंचायत सरपंच सौ. कमलताई हेडो यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांना दिले. यामध्ये शेतकरी, विद्यार्थी, घरगुती ग्राहक आणि लघुउद्योगांच्या समस्यांचा उल्लेख करून तातडीने सब-स्टेशनचे काम हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.

राजेंचे आश्वासन

निवेदन स्वीकारताना माजी राज्यमंत्री आत्राम यांनी नागरिकांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि संबंधित वीज वितरण विभागाशी चर्चा करण्याबरोबरच गडचिरोलीचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याशीही तातडीने संपर्क साधून सब-स्टेशनचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

या प्रसंगी कसमसूर ग्रामपंचायत सरपंच सौ. कमलताई हेडो, जवेली बुर्ज सरपंच कु. अलिशाताई गोटा, वाघेझरी सरपंच विलास कोंदामे, जवेली खुर्द सरपंच मुन्ना पुंगाटी, महादेव पदा उपसरपंच कोटमी, सरपंच सादु कोरामी, घोटसुर सरपंच सिंदू मोहोंदा, मानेवारा उपसरपंच देविदास मटामी, वेनहरा ईलाखा सल्लागार प्रकाश पुंगाटी, सचिव राजू गोमाडी यांच्यासह अनेक गावांचे सरपंच, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

“जर सब-स्टेशनचे काम लवकरच सुरू झाले नाही तर पुढील काळात मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडले जाईल,” असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.

 

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!