जनतेच्या जीवाशी सुरजागड–गट्टा रस्ता!

एटापल्ली विशेष प्रतिनिधी दिनांक 3 सप्टेंबर 2025
गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड–गट्टा हा मार्ग स्थानिकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. दररोज प्रवाशांचा जीव धोक्यात घालून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. आज पुन्हा एकदा अडेंगे–नेडर गावाजवळ राज्य परिवहन महामंडळाची बस रस्त्याच्या कडेला घसरल्याने मोठा अपघात होण्याची वेळ आली होती. सुदैवाने प्रवासी थोडक्यात बचावले, पण काही काळ प्रवाशांमध्ये भिती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
ही घटना एकदाच घडलेली नाही. या रस्त्यावर सतत अपघात होत असून, अनेकदा वाहनं रस्त्याबाहेर घसरली आहेत, काहींचा जीवही गेला आहे. तरीदेखील शासन व प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. लाखो टन लोहखनिज काढण्यासाठी शासन व सत्ताधारी तत्पर असतात, मात्र जनतेच्या सुरक्षिततेसाठी लागणारा रस्ता सुधारण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, अशी तीव्र नाराजी नागरिकांमध्ये आहे.
भाकपा नेत्यांचा आक्रोश
आजच्या घटनेनंतर भाकपा व AIYF ने शासनावर थेट हल्ला चढवला. कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव भाकपा तथा राज्य उपाध्यक्ष AIYF म्हणाले –
“आमचा जीव धोक्यात आहे, आमच्या रस्त्याचा प्रश्न सोडवला जात नाही. पण आमच्या जमिनीतील लोहखनिज मात्र सरकारला हवंच आहे. हे जनतेच्या श्रम आणि जीवनावर केलेले खुले शोषण आहे. जनतेच्या जीवावर चालणारा असा विकास आम्ही कधीही सहन करणार नाही.”
त्यांनी पुढे इशारा देत सांगितले की, स्थानिक जनतेला सुरक्षित रस्ता आणि विकासाच्या मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत तर संघर्ष उभारावा लागेल. शासनाला लोकांच्या जीवाची किंमत नाही, हे वारंवार सिद्ध होत आहे.
नागपूरमध्ये धरणे आंदोलनाची तयारी
गावकरी आणि भाकपा कार्यकर्त्यांचा संताप आता उफाळून आला आहे. अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा करूनही रस्ता दुरुस्त झाला नाही, यामुळे आता संघर्षाशिवाय पर्याय नाही, अशी ग्रामस्थांची भूमिका झाली आहे. त्यानुसार १५ सप्टेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री निवासस्थानासमोर भाकपा तर्फे धरणे आंदोलन उभारले जाणार आहे. हे आंदोलन व्यापक करण्यासाठी स्थानिक पातळीवर तयारी सुरू झाली असून, मोठ्या संख्येने नागरिक नागपूर गाठतील अशी शक्यता आहे.
शासनाने तातडीने लक्ष घालावे
सुरजागड–गट्टा हा मार्ग हा केवळ प्रवासासाठीच नव्हे तर जिल्ह्यातील शेकडो गावांच्या जीवनरेषेसारखा आहे. या मार्गावरील दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच वाहतूक करणारी गाड्या यांचे जीव धोक्यात आहेत. जर शासनाने तातडीने रस्ता दुरुस्ती आणि विकासाच्या दृष्टीने कामे सुरू केली नाहीत, तर कधीही भीषण अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केले आहे की, आता फक्त आश्वासनांवर त्यांना विश्वास नाही. “रस्ता द्या, विकास द्या – अन्यथा जनआंदोलन अटळ आहे” या घोषणांसह ग्रामस्थांनी आगामी काळात व्यापक संघर्ष छेडण्याची तयारी सुरू केली आहे.