आझाद गणेश मंडळ अहेरीतर्फे दिव्यांग बांधवांसाठी वस्त्रवाटप व भोजन कार्यक्रम

अहेरी, विशेष प्रतिनिधी दिनांक:–03 सप्टेंबर 2025
सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत आझाद गणेश मंडळ अहेरी तर्फे आज बुधवार, दिनांक ३ सप्टेंबर रोजी दिव्यांग बांधव-भगिनींसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात पोलिस निरीक्षक मा. हर्षल ऐकरे साहेब यांच्या हस्ते वस्त्रवाटप करण्यात आले तसेच सर्व उपस्थितांसाठी भोजन व्यवस्थाही करण्यात आली.
उत्साहात सहभागी झाले दिव्यांग बांधव
या कार्यक्रमात परिसरातील अनेक दिव्यांग बांधव-भगिनींनी उत्साहाने सहभाग घेतला. राकेश कारेंगुलवार, अनिल पारधी, धनंजय कविराजवार, राकेश मडावी, रामू मडावी, नागराज संतोषवार, गणेश पेंदाम, अक्षय दुर्गे, केतम्मा सापीडवार, माया गेडाम, ज्योती बेजनवार, ललिता टेकाम आदींसह अनेकांचे या उपक्रमात उपस्थित राहणे विशेष ठरले.
मंडळाची सामाजिक बांधिलकी अधोरेखित
आझाद गणेश मंडळ अहेरी केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक कार्यातही सातत्याने पुढाकार घेत असल्याचे या उपक्रमातून दिसून आले. सर्व सदस्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत “समाजातील उपेक्षित घटकांना आधार देणे हीच खरी सेवा” अशी भूमिका मांडली.
ऐकरे यांचे विशेष मार्गदर्शन
पोलिस निरीक्षक हर्षल ऐकरे यांनी या प्रसंगी दिव्यांग बांधवांना वस्त्रवाटप करून त्यांच्याशी संवाद साधला. समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊनच खरी प्रगती साधता येते, असा संदेश देत त्यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.
सर्वत्र समाधानाचा माहोल
वस्त्रवाटप व भोजनामुळे उपस्थित दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत सण-उत्सवाचा आनंद पोहोचवण्याचा आझाद गणेश मंडळाचा हा प्रयत्न सर्वांनाच भावला.