मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने मलेरियामुक्त गडचिरोलीसाठी* *टीसीआय फाउंडेशनची विशेष मोहीम*
टीसीआय फाउंडेशनची विशेष मोहीम*

गडचिरोली / मुंबई, विशेष प्रतिनिधी दिनांक:-11/09/2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी ग्लोबल फंडने टीसीआय फाउंडेशनच्या माध्यमातून व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या प्रकल्पांतर्गत ‘इंटेन्सिफाईड मलेरिया इलिमिनेशन प्रोग्रॅम (IMEP-3)’ राबविला जाणार असून, त्यामध्ये रोगनियंत्रणासाठी देखरेख, तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध करून देणे, समाजात जागरूकता वाढविणे तसेच प्रभावी डास नियंत्रण उपाययोजना राबविणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.
“गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी स्पेशल टास्क फोर्स गठीत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणार आहे. मलेरियाचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी परिणामकारक नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीद्वारे मलेरिया निर्मूलन शक्य आहे. टास्क फोर्स तसेच टीसीआय फाउंडेशनचे सहकार्य गडचिरोली जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्याच्या दिशेने गती देईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०३० पर्यंत भारत मलेरियामुक्त करण्याचे ध्येय निश्चित केले असून महाराष्ट्र राज्य हे ध्येय साध्य करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. मलेरियामुक्त महाराष्ट्र हे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य आश्वासक पावले टाकत आहे”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्लोबल फंडने सन २०२१-२०२४ (GC6) आणि सन २०२४-२०२७ (GC7) या कालावधीत टीसीआय फाउंडेशनची प्रमुख प्राप्तकर्ता (Principal Recipient) म्हणून निवड केली आहे. देशभरात मलेरिया निर्मूलन उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी ही संस्था केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल सेंटर (NCVBDC) सोबत तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत आहे.
0000