# शालेय आरोग्य शिबिराच्या मागणीकडे दुर्लक्ष : २० दिवस उलटूनही विद्यार्थ्यांची तपासणी नाही.. – VIDARBHANEWS 24
विशेष वृतान्त

शालेय आरोग्य शिबिराच्या मागणीकडे दुर्लक्ष : २० दिवस उलटूनही विद्यार्थ्यांची तपासणी नाही..

सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक:-08 ऑगस्ट 2025
 सिरोंचा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, सिरोंचा येथील ५ वी ते १२ वी इयत्तेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी मागणी करूनही तब्बल २० दिवस उलटले, तरीही ग्रामिण रुग्णालय, सिरोंचा प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. परिणामी, सुमारे ७४० विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली तपासणी प्रक्रिया अद्यापही रखडली आहे.

मुख्याध्यापक  मरसकोल्हे यांनी याबाबत विदर्भ न्यूज 24 शी बोलताना स्पष्ट सांगितले की, “विद्यार्थ्यांना त्यांच्या रक्तगटाची माहिती असावी या हेतूने आम्ही तीन दिवसांच्या आरोग्य शिबिराची विनंती केली होती. मात्र, रुग्णालयातून उत्तर येतं की डॉक्टर उपलब्ध नाहीत आणि सिस्टर किंवा टेक्निशियन तपासणी करतील. अशा प्रकारे २० दिवस उलटून उत्तर मिळणं ही गंभीर बाब आहे.”

शालेय आरोग्य तपासणी ही शासनाच्या दृष्टीनेदेखील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, यामुळे विद्यार्थ्यांमधील आरोग्यविषयक समस्या वेळेवर लक्षात येतात आणि त्यावर उपाययोजना करता येते. मात्र, स्थानिक रुग्णालय प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे शाळा प्रशासनाचीही अडचण वाढली आहे.

शिक्षक वर्गाच्या म्हणण्यानुसार, “दोन आठवड्यांहून अधिक काळ झाला तरी शिबिराचे नियोजन नाही. रुग्णालयाने वेळ दिला तरी डॉक्टर अनुपस्थित असतात. आमच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य ही प्राथमिकता असावी, परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे.”

या प्रकरणामुळे पालकवर्गामध्येही नाराजीचे वातावरण आहे. शासनाकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी निधी मंजूर होत असूनही, याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

तपासणी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
मुख्याध्यापक, शिक्षक व पालक यांनी एकमुखाने ठरवले आहे की, जर लवकरात लवकर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले नाही, तर संपूर्ण शाळेच्या वतीने ग्रामिण रुग्णालयासमोर निदर्शने करण्यात येतील.

या प्रकाराबाबत वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी शाळेतील पाल्यांकडून होत आहे

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!