स्थानिकांना नाकारून बाहेरच्या कंपनीचा डाव? गडचिरोलीत कंत्राटदार संघटनांचा बांधकाम विभागाविरुद्ध एल्गार!
दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कॉन्ट्रॅक्टर संघटनेचा इशारा — “हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही”

गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क | दिनांक: 28 जुलै 2025
गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक कंत्राटदारांनी आपले सर्वस्व पणाला लावून रस्ते व इतर शासकीय बांधकामे उत्तमरित्या पूर्ण केली आहेत. मात्र, आता जिल्ह्यात बाहेरील एका नव्या कंपनीने अचानक हस्तक्षेप करत स्थानिकांचे प्रलंबित व चालू प्रकल्प हिसकावण्याचा प्रयत्न सुरू केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कॉन्ट्रॅक्टर संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. संघटनेने बांधकाम विभागावर थेट आरोप करत म्हटले की, “जिल्ह्यात एका माजी अधीक्षक अभियंता व काही बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने, अनुभव नसलेल्या एका बाहेरील कंपनीला जिल्ह्यातील टेंडर मिळवून देण्याचा प्रकार सुरू आहे. यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचे कारस्थान लपले आहे.”
यावेळी संघटनेचे सल्लागार डॉ. प्रणय खुणे यांनी ठामपणे सांगितले की, “बांधकाम विभागाची हुकूमशाही व अन्याय सहन केला जाणार नाही. गरज भासल्यास रस्त्यावर उतरून चक्का जाम, उपोषण करण्याची वेळही आम्ही मागे ढकलणार नाही.”
संघटनेच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे:
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय रस्ते व बांधकामे ही स्थानिक कंत्राटदारांनाच देण्यात यावीत.
अनुभव नसलेल्या बाहेरील कंपनीकडून चालवलेले सर्व काम तात्काळ थांबवण्यात यावे.
बांधकाम विभागाने नुकतेच केलेले एकूण पाच टेंडर रद्द करण्यात यावेत.
या संदर्भातील सर्व माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्यासमोर मांडण्यात येणार आहे.
✊ संघटनेचा इशारा:
जर शासन व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास, दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कॉन्ट्रॅक्टर संघटना लवकरच जिल्हाभर आंदोलन छेडणार आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ बोंम्मावार, सचिव अरुण मुक्कावार, सल्लागार नितीन वायलालवार, सहसचिव राकेश गुब्बावार, प्रवक्ते अश्विन मेड्डीवार, मार्गदर्शक डॉ. प्रणय खुणे, आणि असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार, दर्जेदार रस्ते आणि बांधकाम क्षेत्रात स्थानिक सहभाग सुनिश्चित करणाऱ्या या मागणीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक ठरत आहे.
–-संपर्क – विदर्भ न्यूज 24 प्रतिनिधी, गडचिरोल
—