कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा कडून स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पेट्रोल पंपाच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक उपक्रम….

सिरोंचा (विदर्भ न्यूज 24) दिनांक 15 ऑगस्ट 2025
आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी संपूर्ण देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा होत असताना, सिरोंचा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने एक ऐतिहासिक आणि विकासाभिमुख पाऊल उचलले. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने आयोजित विशेष कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या पेट्रोल पंपाच्या निर्मितीसाठी भूमिपूजन करण्यात आले.
हा भूमिपूजन सोहळा अष्टपैलू व्यक्तिमत्व धारित आणि शेतकरीहितासाठी सदैव तत्पर असलेल्या मा. श्री. रवीभाऊ राल्लाबंडीवार (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी समितीचे मा. श्री. सतीशकुमार गंजीवार (सभापती), मा. श्री. क्रीष्णमूर्ती रिकुला (उपसभापती), मा. श्री. जगदीश राल्लाबंडीवार (संचालक) यांच्यासह सर्व संचालक, प्र. सचिव, प्र. लेखापाल आणि समितीचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मा. श्री. सतीशकुमार गंजीवार यांनी सांगितले की, “हा पेट्रोल पंप केवळ शेतकरी बांधवांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही अत्यंत उपयुक्त ठरेल. इंधनपुरवठा सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने करण्याचे आम्ही वचन देतो. तसेच, समितीच्या उत्पन्नात वाढ होऊन त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळेल.”
उपसभापती मा. श्री. क्रीष्णमूर्ती रिकुला यांनी या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर माहिती देताना सांगितले की, बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात विकासाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असून, या भागातील आर्थिक व्यवहारात चैतन्य येईल.
यावेळी कार्यक्रमस्थळी देशभक्तीपर वातावरण होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रीय ध्वज फडकवून, उपस्थित मान्यवरांनी देशभक्तीपर गीते गाऊन आणि शेतकरीहिताचे संकल्प उच्चारून भूमिपूजन कार्यक्रमाला विशेष महत्त्व दिले.
कार्यक्रमाचे संचालन सचिवांनी तर आभार प्रदर्शन लेखापालांनी केले