राष्ट्रीय महामार्ग 353C वर खड्ड्यांमध्ये धान रोवून प्रशासनाचा निषेध : सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचा इशारा…

अहेरी विशेष प्रतिनिधी दिनांक:- 17 ऑगस्ट 2025
गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली–सिरोंचा जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353C गेल्या अनेक महिन्यांपासून दयनीय अवस्थेत आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, असमान पृष्ठभाग व डांबरीकरणाची निकृष्ट कामे यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. स्थानिक नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे.
याच पार्श्वभूमीवर येत्या 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता जिमलगट्टा फाटा येथे अनोख्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष ताटीकोंडावार करणार आहेत. प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतप्त नागरिक रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये धानाची रोवणी व वृक्षारोपण करून निषेध व्यक्त करणार आहेत.
ताटीकोंडावार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,
> “अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधूनही या महामार्गाची दुरुस्ती झालेली नाही. जनतेचे हाल सोसणे आता शक्य नाही. अपघातांत जीवितहानी होत आहे, तरीही शासन व संबंधित विभाग डोळेझाक करत आहेत. त्यामुळे आम्ही नागरिकांसोबत मिळून या खड्ड्यांमध्ये धानाचे रोप लावून शासनाला वास्तवाचे भान देणार आहोत.”
परिसरातील नागरिकांनीही या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “सिरोंचा–आलापल्ली हा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक दळणवळणाचा कणा असून त्याचे खड्डेमय झालेले रूप ही संपूर्ण जनतेची शोकांतिका आहे” असे स्थानिकांनी सांगितले.

या आंदोलनाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले असून प्रशासनाने तरीही वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर हा मुद्दा आणखी उग्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
#विदर्भन्यूज24 #NH353C #Protest #Gadchiroli