माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन स्थळी भेट
माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन स्थळी भेट

अहेरी (प्रतिनिधी) दिनांक:–02 सप्टेंबर 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्या बेमुदत कामबंद आंदोलनाला माजी राज्यमंत्री व माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम महाराज यांनी सोमवारी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची विचारपूस केली.
अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय व तालुका आरोग्य केंद्रासमोर सुरू असलेल्या या आंदोलनात राज्य शासनाने थांबवून ठेवलेल्या नियमित सेवेत समायोजन प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी मागणी प्रमुख्याने करण्यात येत आहे. १४ मार्च २०२४ रोजी शासनाने दिलेल्या निर्णयानुसार ही प्रक्रिया पुढे न्यायची असताना ती ठप्प झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्यांना १० वर्षांची सेवा पूर्ण झालेली नाही, अशांना बदली धोरण, वेतनवाढ, ईपीएफ, आरोग्य व अपघात विमा यांसारख्या सोयी लागू व्हाव्यात. या मागण्यांसाठीच बेमुदत कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
या आंदोलन स्थळी उपस्थित राहून राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. त्यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन देताना सांगितले की,
> “तुमच्या मागण्या रास्त आहेत. त्या शासनापर्यंत पोहचविण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन व त्वरित तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेन.”
सदर भेटीदरम्यान युवा नेते मा. कुमार अवधेशरावबाबा आत्राम, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार, भाजप तालुका अध्यक्ष विकास तोडसाम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या भेटीनंतर आंदोलनकर्त्यांना दिलासा मिळाला असून, आता शासनाने योग्य तो निर्णय घेऊन या प्रश्नाचा तातडीने निपटारा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.