खुनाच्या गुन्ह्यात सक्रीय असलेल्या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलिसांची हैद्राबादेतून अटक
नोव्हेंबर 2023 मधील कापेवंचा खुनात प्रत्यक्ष सहभाग – महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या दोन लाखांच्या बक्षिसावर मिळाले यश

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक– 07सप्टेंबर 2025
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी मोहिमेत गडचिरोली पोलिस दलाने पुन्हा एक मोठे यश मिळवले आहे. खुनाच्या गुन्ह्यात थेट सहभागी असलेल्या एका जहाल माओवाद्यास पोलिसांनी गोपनियरित्या राबवलेल्या कारवाईतून हैद्राबाद (तेलंगणा) येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या माओवाद्याचे नाव शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा (वय 25, रा. बांदेपारा, ता. भोपालपट्टनम, जि. बीजापूर, छत्तीसगड) असे असून, त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
–-कापेवंचा खुनाचा मुख्य आरोपी
नोव्हेंबर 2023 मध्ये मौजा कापेवंचा येथे रामजी चिन्ना आत्राम या निरपराध व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या खुनात शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे तपासात उघड झाले. या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्यावर अहेरी पोलीस ठाण्यात अप.क्र. 0411/2023, भादंवि कलम 302, 147, 148, 149, 120 (ब) तसेच भाहका कलम 3 व 27 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.-
–नक्षल दलातील प्रवास
▪️ सप्टेंबर 2018 – छत्तीसगडमधील नॅशनल पार्क एरियातील मद्देड दलम मध्ये भरती.
▪️ डिसेंबर 2018 – गडचिरोली विभागात बदली, डिव्हीसीएम शंकरअण्णा ऊर्फ शिवा यांचा अंगरक्षक म्हणून 2022 पर्यंत काम.
▪️ 2022 ते 2024 – पेरमिली दलम मध्ये सदस्य पदावर कार्यरत.
––कार्यकाळातील गुन्हेगारी पार्श्वभूमी
चकमकी – 4
2020 – येडदर्मी जंगल परिसरातील चकमक.
2021 – मडवेली जंगल परिसरातील चकमक.
2023 – वेडमपल्ली जंगल परिसरातील चकमक.
2024 – चितवेली जंगल परिसरातील चकमक.
खून – 1
नोव्हेंबर 2023 मध्ये मौजा कापेवंचा येथे रामजी चिन्ना आत्राम यांची हत्या.
पोलिसांची रणनीती आणि अटक
गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सी-60 पथक व सपोनि. प्रशांत बोरसे यांच्या नेतृत्वात जवानांनी हैद्राबाद येथे गुप्त कारवाई केली. शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा हा काही महिन्यांपासून तेथे वास्तव्यास होता. गुप्त माहितीच्या आधारे पाळत ठेवून 04 सप्टेंबर 2025 रोजी त्याला अटक करण्यात आली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.-
–-पोलिसांच्या कारवाईत समाविष्ट अधिकारी
विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, सत्य साई कार्तिक, गोकुल राज जी., उप-अधीक्षक विशाल नागरगोजे यांचे मार्गदर्शन या कारवाईला लाभले. तांत्रिक इंटेलिजन्स शाखेचे सपोनि. प्रशांत बोरसे, पोउपनि. अक्षय लव्हाळे, पवन जगदाळे, पोहवा संतोश नरोटे, पोअं राहुल दुर्गे तसेच सी-60 पथकातील जवानांनी ही मोहीम पार पाडली.
––पोलिसांचे आवाहन
या कारवाईनंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवादी कार्यकर्त्यांना हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले आहे. तसेच गडचिरोली पोलिसांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कारवाईमुळे मागील तीन वर्षांत 108 माओवादी अटकेत आल्याचे त्यांनी सांगितले.
—✍️ विदर्भ न्यूज 24