“सेवा पंधरवडा”तून शेवटच्या घटकापर्यंत शासकीय सेवा पोहचणार – तहसीलदार निलेश होनमोरे

सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक:–10 सप्टेंबर 2025
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे आणि शासनाच्या सेवा थेट शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने महसूल विभागामार्फत दिनांक १७ सप्टेंबर (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस) पासून ते २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवडा” राबविण्यात येणार आहे. या पंधरवड्यातील सर्व उपक्रम प्रभावी व युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले असून यासाठीचे सूक्ष्म नियोजन पूर्ण झाले असल्याची माहिती तहसीलदार निलेश होनमोरे यांनी दिली.
या “सेवा पंधरवडा” अंतर्गत उपक्रम तीन टप्प्यांमध्ये राबविले जाणार आहेत :
––पहिला टप्पा : पाणंद रस्ते मोहीम (१७ ते २२ सप्टेंबर २०२५)
या टप्प्यात पाणंद/शिवार रस्त्यांचे सर्वेक्षण, क्रमांकन, गावनकाशावर चिन्हांकन व नोंदणीचे काम केले जाणार आहे. शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्रे घेणे तसेच प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष ‘रस्ता अदालत’ आयोजित केली जाणार आहे.
—दुसरा टप्पा : “सर्वांसाठी घरे” आणि पट्टे वाटप मोहीम (२३ ते २७ सप्टेंबर २०२५)
या उपक्रमांतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी शासकीय जमिनींचे पट्टे वाटप केले जाणार आहे. तसेच शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुसार नियमित करून ‘सर्वांसाठी घरे’ योजनेचा लाभ लोकांना मिळवून देण्यावर भर राहणार आहे.
—तिसरा टप्पा : नावीन्यपूर्ण उपक्रम (२८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५)
या टप्प्यात लक्ष्मीमुक्ती योजना, आपसी वाटणीची प्रकरणे निकाली काढणे तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रमाणपत्रांचे वाटप असे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
—-तहसीलदार निलेश होनमोरे यांनी सांगितले की,
> “यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत ‘सेवा पंधरवडा’च्या माध्यमातून महसूल विभाग लोकांच्या सेवेसाठी सज्ज आहे. या उपक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येईल. तसेच, स्थानिक लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग घेऊन ही मोहीम यशस्वी करण्याचे प्रयत्न राहतील.”
तहसीलदारांनी सिरोंचा तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले की,“या सेवा पंधरवड्यात आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचा लाभ प्रत्येक नागरिकाने घ्यावा.” असे आव्हान सिरोंचाचे तहसीलदार निलेश होनमोरे यांनी केली आहे
—✍ संपादक – विदर्भ न्यूज 24
www.vidarbhanews24.com