*गडचिरोलीत ‘ट्रॅक्टर टेक’ कौशल्य विकास कार्यक्रम सुरू होणार – महिंद्रा अँड महिंद्रा व राज्य शासनाचा सामंजस्य करार*

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक :–11 सप्टेंबर 2025
जिल्ह्यातील तरुणांसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.), गडचिरोली येथे ‘ट्रॅक्टर टेक’ हा ट्रॅक्टर तंत्रज्ञानावरील व्यावसायिक कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी व महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना आधुनिक कृषी यंत्रसामग्री व ट्रॅक्टर तंत्रज्ञानावरील उच्चस्तरीय प्रशिक्षण मिळावे व त्यातून स्थानिक पातळीवर रोजगार संधी निर्माण होण्यास तसेच कृषी व औद्योगिक क्षेत्रात कौशल्यपूर्ण मनुष्यबळ घडविण्यास मदत होणार व्हावी, हा यामागील उद्देश असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
सह्याद्री अतिथिगृह येथे काल झालेल्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या राज्य नाविन्यता सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत हा सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अपुर्वा पालकर, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, आयुक्त लहूराज माळी, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
—