# मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. प्रकाश आमटे यांना लोकनेते स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार प्रदान – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हामहाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. प्रकाश आमटे यांना लोकनेते स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार प्रदान

डॉ. प्रकाश आमटे यांनी आदिवासींना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सहकार्य करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

धुळे विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-27/09/2025

           आरोग्य, शिक्षण, शेती, जलसंधारण या क्षेत्रात प्रयोगशीलतेच्या माध्यमातून आदिवासींच्या जीवनात मोठे परिवर्तन घडविण्याचे, त्यांच्यातील आत्माभिमान जागृत करण्याचे आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देण्याचे काम डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. त्यामुळे जीवनाचे समर्पण लोकसेवेसाठी दिलेल्या स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या नावाने असलेला पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे यांना दिल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

लोकनेते, माजी मंत्री स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त अभिवादन व लोकनेते स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कारार्थी, ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांना श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मध्य प्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय, पणन मंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार स्मिता वाघ, डॉ. शोभा बच्छाव, मंदाकिनी आमटे, लता पाटील, माजी आमदार कुणाल पाटील, लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील सामाजिक कृतज्ञता ट्रस्टचे अध्यक्ष विनय पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, बाबा आमटे यांनी कुष्ठरोगी आणि आदिवासी समाजासाठी मोठे कार्य केले. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून एकतेचा विचार देशभर पोहोचविला. जिथे जाण्यासाठी रस्ताही नव्हता, अशा हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाच्या कामासाठी मंदाकिनी आमटे यांनीही डॉ. प्रकाश आमटे यांना समर्थ साथ दिली. आमटे परिवारातील तिसरी पिढी या प्रकल्पांसाठी कार्यरत आहे. अनेक अडचणींतून मार्ग काढत डॉ. आमटे यांनी अविरतपणे हा प्रकल्प सुरू ठेवला आहे आणि पुढेही सुरू रहावा, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

धुळेकरांच्या पाठीशी राज्य शासन ताकदीने उभे राहील

स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी आल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विधानसभेत त्यांचे नेतृत्व आणि कर्तृत्वाचा परिचय झाला. विविध विषयांची जाण असतानाही त्यांचा स्वभाव विनम्र होता. विधानमंडळात संघर्षाची वेळ आली तरी शांतपणे एखादा मुद्दा हाताळण्याचे कसब त्यांच्यात होते. त्या काळात राज्याच्या विधानसभेत सर्वसमावेशक नेत्यांमध्ये दाजीसाहेबांचा समावेश होता.

दाजीसाहेबांनी खानदेशच्या विकासाचा विचार सतत मनात ठेवून त्यासाठी संघर्ष उभा केला. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न राज्य शासनाच्या माध्यमातून होत आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सुलवाडे-जामफळसारख्या प्रकल्पाने धुळे तालुक्याचा संपूर्ण कायापालट येत्या काळात होणार आहे. मनमाड-इंदूर रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केला आहे. सहा राष्ट्रीय महामार्ग आणि मनमाड-इंदूर रेल्वे यामुळे येत्या काळात धुळ्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे. अक्कलपाडा प्रकल्प 100 टक्के भरावा म्हणून भूसंपादनासाठी आवश्यक निधी देण्यात येईल.

राज्यातील पूरपरिस्थितीची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देण्यासोबत राज्यात संरक्षण कॉरिडॉर निर्माण करण्यासाठी विनंती केली आहे. त्यातील एक कॉरिडॉर नाशिक आणि धुळे आहे. यामुळे धुळ्यातील तरुणांच्या हाताला मोठ्या प्रमाणात काम मिळेल. धुळ्यासोबत नंदुरबारमध्येही गुंतवणूक येत आहे. 15 ते 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या परिसरात येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना औद्योगिक महत्व येण्यासाठी राज्य शासन ताकदीने उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

मध्यप्रदेशचे मंत्री श्री. विजयवर्गीय म्हणाले, स्व.दाजीसाहेबांना समाजकार्याचा वारसा वडिलांकडून मिळाला होता. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात बहुमोल कार्य केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था करणे, आरोग्यसाठी सुविधा उभारणे असे विविधांगी आणि प्रेरणादायी कार्य त्यांनी केले. त्यांच्या स्मृतीत समाजसेवेसाठी पुरस्कार सुरू करणे अभिनंदनीय बाब आहे. जनेसेवेचे हे कार्य असेच पुढे जावे, असे त्यांनी सांगितले. बाबा आमटे हे अद्भुत व्यक्तिमत्वाचे धनी होते. कुष्ठरोग्यांमध्ये राहून त्यांची सेवा करण्याचे त्यांचे कार्य अतुलनीय होते. त्यांचे हे कार्य डॉ.प्रकाश आमटे यांनी पुढे नेल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना डॉ.आमटे म्हणाले, बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करून त्यांच्या मनात स्वाभिमान निर्माण केला. त्यांचे हे कार्य जगभरात पोहोचले. त्यांच्या कामाचे महत्त्व लक्षात आल्यावर आम्ही दोन्ही भावांनी आनंदवनाचे कार्य पुढे नेण्याचे निश्चित केले. भामरागड येथे बाबांसोबत भेट दिल्यानंतर आदिवासी जनतेतील कुपोषण, त्यांच्या समस्या पाहून त्यांच्या उत्थानाच्या कार्याला वाहून घेण्याचा निश्चय केला. त्यातूनच लोकबिरादरी प्रकल्पाची कल्पना पुढे आली. लोकांच्या सहकार्य आणि विश्वासातून हे कार्य पुढे गेले. आज अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात या परिसरातील तरुण पुढे गेले आहेत. गेली 52 वर्षे हे जनसेवेचे हे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. स्व.दाजीसाहेबांनी राजकारणासोबत समाजकारण करताना समाजसेवेचा वारसा पुढे नेला असेही डॉ.आमटे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुणाल पाटील यांनी केले. स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या कार्यातून नागरिकांना समाजसेवेची प्रेरणा मिळावी यासाठी हा पुरस्कार सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुलवाडे-जामफळ योजनेचे स्वप्न स्व.दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी पाहिले होते. राज्य शासनाच्या प्रयत्नातून ही योजना पूर्ण होणार असल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण होईल, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या कार्यावर आधारित स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार अमरिशभाई पटेल, आमदार सत्यजित तांबे, आमदार काशिराम पावरा, आमदार दिलीप बोरसे, आमदार मंजुळाताई गावित, आमदार अनुप अग्रवाल, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील आणि अण्णासाहेब चुडामण पाटील यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

000

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker