*राष्ट्रीय लोकअदालतीत ५३१ प्रकरणे निकाली; तब्बल १.६६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई वसूल*

गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:–14/09/2025
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण ३२३ प्रलंबित खटले व २०८ दाखलपूर्व खटले आपसी तडजोडीतून निकाली काढण्यात आले. या माध्यमातून एकूण ₹१ कोटी ६६ लाख ३७ हजार ४५२ इतकी नुकसान भरपाई वसूल करण्यात आली. तसेच किरकोळ गुन्हा प्रकरणांमध्ये २६३ प्रकरणे गुन्हा कबुलीद्वारे निकाली निघाले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे आदेशान्वये व मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये दि. १३ सप्टेंबर, २०२५ रोजी या वर्षातील तिसऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या लोकअदालतीमध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, धनादेश प्रकरणे (कलम १३८, एन. आय. अॅक्ट), कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, बँक व पतसंस्थांची थकीत कर्ज प्रकरणे, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची थकीत विजबिल प्रकरणे, फायनान्स कंपनीची कर्ज प्रकरणे तसेच दाखलपूर्व वादांचा निपटारा करण्यात आला. यासाठी जिल्ह्यात एकूण ९ पॅनल कार्यरत ठेवण्यात आले होते.
जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथील पॅनल क्रमांक २ वर वैवाहिक वादाच्या एका प्रकरणात पती-पत्नी यांच्यात समझोता होऊन पत्नी नांदायला गेली. या विशेष प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांनी उभयतांचा सत्कार केला.
सदर लोकअदालतीत पॅनल क्र. ०१ वर व्हि. एस. खोत, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, गडचिरोली यांनी कामकाज पाहिले. पॅनल क्र. ०२ वर मा. एस. पी. सदाफळे, दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) यांनी कामकाज पाहिले. गुन्हा कबुलीद्वारे प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथे विशेष न्यायालय ठेवण्यात आले होते. सदर न्यायालयात एस. बी. विजयकर, मुख्य न्यायदंडाधिकारी, गडचिरोली यांनी कामकाज पाहिले.
पॅनल सदस्य म्हणून पॅनल क्रमांक ०१ मध्ये सौ. सुरेखा बारसागडे, विधी स्वयंसेविका व पॅनल क्रमांक ०२ मध्ये श्री. बालाजी बावने, विधी स्वयंसेवक यांनी कार्य केले. लोकअदालतीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. श्री. किशोर आखाडे, जेष्ठ अधिवक्ता वृंद, समस्त अधिवक्ता वृंद, न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.