# *गडचिरोलीत माओवाद्यांचा मोठा आत्मसमर्पण धडाका – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हाताज्या घडामोडी

*गडचिरोलीत माओवाद्यांचा मोठा आत्मसमर्पण धडाका

डीजीपी रश्मि शुक्ला यांच्या समोर 11 वरिष्ठ माओवाद्यांचे शस्त्रांसह समर्पण; 82 लाखांचे इनामी नक्षली झाले शरण

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:,10/12/2025

दंडकारण्यातील माओवादी चळवळीला निर्णायक धक्का देणारी आणि सुरक्षादलांच्या सातत्यपूर्ण दबावाची प्रभावी छाप उमटवणारी ऐतिहासिक घटना आज गडचिरोलीत घडली. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या समोर एकूण 11 वरिष्ठ माओवाद्यांनी, त्यात 02 डिव्हीसीएम, 03 पीपीसीएम, 02 एसीएम आणि 04 सदस्य पदावरील, अशा उच्च श्रेणीतील कॅडरने आत्मसमर्पण केले.
विशेष म्हणजे, त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले एकूण 82 लाखांचे बक्षिस होते. यातील चार माओवादी गणवेशात व शस्त्रांसह शरण आले, ही अत्यंत दुर्मिळ आणि महत्वाची घटना मानली जाते.

सन 2025 मध्ये गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ यांच्या संयुक्त दबाव, सातत्यपूर्ण अभियान आणि विविध नागरी कृतींच्या प्रभावामुळे आजपर्यंत 112 माओवाद्यांनी शस्त्र त्यागून आत्मसमर्पण केले असून, हा आकडा गेल्या अनेक वर्षातील सर्वाधिक आहे. 2005 पासून सुरु असलेल्या आत्मसमर्पण धोरणामुळे आणि पोलीस दलाच्या पुनर्वसन कार्यामुळे गेल्या दोन दशकांत गडचिरोली जिल्ह्यात तब्बल 783 माओवादी मुख्य प्रवाहात दाखल झाले आहेत.

आत्मसमर्पण करणाऱ्या 11 वरिष्ठ माओवाद्यांची संपूर्ण माहिती

आज आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांमध्ये दंडकारण्यातील अनेक कुख्यात आणि वर्चस्वशाली कॅडरचा समावेश आहे :

1. रमेश उर्फ भिमा उर्फ बाजू गुड्डी लेकामी (डिव्हीसीएम – भामरागड दलम)
– वय 57, एडसगोंदी, जि. गडचिरोली
– 2004 ते 2025 या काळात विविध दलमांमध्ये सदस्य, एसीएम, डिव्हीसीएम अशा महत्वाच्या पदांवर कार्य
– 88 गुन्ह्यांमध्ये सहभाग : 43 चकमकी, 08 जाळपोळ, 37 विविध गुन्हे

2. भिमा उर्फ सितु उर्फ किरण हिडमा कोवासी (डिव्हीसीएम / पश्चिम बस्तर डिव्हीजन कमिटी सदस्य)
– वय 46, सुकमा (छ.ग.)
– बटालियन क्रमांक 01 मध्ये कुप्रसिद्ध हिडमासोबत उपकमांडर
– अनेक मोठ्या चकमकींसाठी संशयित, पडताळणी सुरू

3. पोरीये उर्फ लक्की अडमा गोटा (पीपीसीएम/सेक्शन कमांडर, पीएलजीए बटालियन क्र. 01)
– वय 41
– 2003 पासून दंडकारण्यात सक्रिय भूमिका

4. रतन उर्फ सन्ना मासु ओयाम (पीपीसीएम/एसीएम, कंपनी क्र. 07)
– वय 32
– 2012 पासून सतत युद्धक कारवायांमध्ये सक्रिय

5. कमला उर्फ रागो इरिया वेलादी (पीपीसीएम/एसीएम, कंपनी क्र. 07)
– वय 30
– महिला विंगमधील एक वरिष्ठ जबाबदार कॅडर

6. पोरीये उर्फ कुमारी भिमा वेलादी (एसीएम – एमएमसी झोन, कान्हा भोमरदेव दलम)
– वय 36
– 2006 पासून– नॅशनल पार्क–माड एरिया–एमएमसी झोनमध्ये सतत नेतृत्व भूमिका

7. रामजी उर्फ मुरा लच्छु पुंगाटी (एसीएम – कुतूल एरिया कमिटी)
– वय 35
– डिकेएमएस–आरपीसी–जनताना सरकार यात महत्वाच्या नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या

8. सोनू पोडीयाम उर्फ अजय सानू कातो (सदस्य–प्लाटून क्र. 02 कंपनी क्र. 01)
– वय 21
– सीएनएम आणि नंतर बटालियनच्या सुरक्षेत कार्यरत

9. प्रकाश उर्फ पांडू कुंड्रा पुंगाटी (सदस्य–प्लाटून क्र. 32)
– वय 22

10. सिता उर्फ जैनी तोंदे पल्लो (सदस्य–प्लाटून क्र. 32)
– वय 22

11. साईनाथ शंकर मडे (सदस्य – AOB दलम, सिसिएम उदयचा गार्ड)
– वय 23

गडचिरोलीतील माओवादी चळवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर – मोठ्या नेतृत्वाच्या शरणागतींचा परिणाम

गतवर्षभरात दंडकारण्यातील सर्वोच्च नेतृत्वाच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी संघटनेची घडी मोडू लागल्याचे संकेत मिळत आहेत.
1 जानेवारी 2025 रोजी ताराक्का सिडामसह 11 माओवादी आणि 15 ऑक्टोबर 2025 रोजी पोलीत ब्युरो सदस्य, केंद्रीय समिती सदस्य, सीपीआय (माओवादी) प्रवक्ते मल्लोजुला वेनुगोपाल राव उर्फ भुपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर शरणागती पत्करली होती.
या घटनांमुळे दंडकारण्यातील माओवादी चळवळ कोलमडून पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

-सी-60 व विशेष अभियान पथकाचा भव्य सत्कार

डीजीपी शुक्ला यांच्या उपस्थितीत पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
लाहेरी परिसरापर्यंत जाऊन जीवाची बाजी लावून 2025 मध्ये 61 माओवाद्यांचे व 54 अग्निशस्त्रांसह आत्मसमर्पण घडवून आणणाऱ्या सी-60 व विशेष अभियान पथकाच्या अधिकारी-जवानांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.

डीजीपी शुक्ला यांनी म्हटले :
“गडचिरोली पोलीस दलाचे कार्य संपूर्ण देशासाठी आदर्श आहे. शिल्लक माओवादी हिंसा सोडून शांततेचा मार्ग स्वीकारतील हीच अपेक्षा.”

-‘प्रोजेक्ट उडान’ – शासन योजनांची मार्गदर्शिका पुस्तकाचे अनावरण

दुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या सर्व योजनांची सुलभ माहिती मिळावी म्हणून गडचिरोली पोलिसांनी तयार केलेल्या ‘प्रोजेक्ट उडान – वेध विकासाचा’ या विस्तृत शासकीय योजना मार्गदर्शिकेचे अनावरण डीजीपी शुक्ला यांच्या हस्ते झाले.
अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे आणि सर्व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर

– डॉ. छेरिंग दोरजे (अपर पोलीस महासंचालक – विशेष कृती)
– श्री. अंकित गोयल (पोलीस उप-महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र)
– श्री. अजय शर्मा (उप-महानिरीक्षक – सीआरपीएफ अभियान)
– श्री. नीलोत्पल (पोलीस अधीक्षक, गडचिरोली)
– श्री. एम. रमेश (अपर पोलीस अधीक्षक – अभियान)
– श्री. कार्तिक मधीरा (अपर पोलीस अधीक्षक – अहेरी)
– श्री. अनिकेत हिरडे (सहाय्यक पोलीस अधीक्षक – धानोरा)
– श्री. विशाल नागरगोजे (उप-अधीक्षक – अभियान)

पोलीस दलाचा अखंड परिश्रम

या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष अभियान पथक, सर्व शाखा, अंमलदार व पोलीस मुख्यालयातील अधिकारी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

 

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!