राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवी सुलतान यांच्या हस्ते विशेष बस सेवेचे उद्घाटन
सिरोंचा विदर्भ न्यूज प्रतिनिधी दिनांक 28 जानेवारी 2026
आदिवासी श्रद्धेचा महासागर मानल्या जाणाऱ्या तेलंगणातील नंदी मेडाराम येथे भरविण्यात येणाऱ्या विश्वप्रसिद्ध सामक्का–सारक्का महाकुंभ यात्रेसाठी सिरोंचा तालुक्यातील भाविकांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. भाविकांच्या सुरक्षित व सोयीस्कर प्रवासासाठी भूपालपल्ली RTC बस डेपोकडून तब्बल ३० विशेष बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
ही विशेष बस सेवा दि. २६ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत सुरू राहणार असून, हजारो भाविकांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती भूपालपल्ली RTC डेपोचे इन्चार्ज पी. के. मूर्ती यांनी दिली.
या बस सेवेचे औपचारिक उद्घाटन दि. २६ जानेवारी रोजी भूपालपल्ली RTC डेपो मॅनेजर हिंदू मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली, सिरोंचाचे शहराध्यक्ष रवीजी सुलतान यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी शहरातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते, RTC कर्मचारी उपस्थित होते.
तेलंगणा राज्य सरकारने भूपालपल्ली RTC बस डेपोच्या माध्यमातून सिरोंचा तालुक्यातील भाविकांसाठी ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्याने परिसरात समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दर दोन वर्षांनी भरणाऱ्या या महाकुंभ यात्रेसाठी भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होत असतात. मात्र, प्रवासाची अडचण अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरत होती. आता मात्र RTC च्या या निर्णयामुळे भाविकांचा मोठा भार हलका झाला आहे.
यावेळी बोलताना डेपो मॅनेजर हिंदू मॅडम यांनी भाविकांना आवाहन केले की, RTC बस सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. RTC बस प्रवास हा सुरक्षित, विश्वासार्ह आणि किफायतशीर असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या सुविधेमुळे भाविकांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळाली असून, यात्रेचा उत्साह द्विगुणित झाला आहे. श्रद्धा, विश्वास आणि सेवाभाव यांचा संगम असलेल्या या उपक्रमामुळे सामक्का–सारक्का महाकुंभ यात्रेची वाट अधिक सुकर झाली आहे.
या कार्यक्रमास नारायण मूडीमडीगेला, नंदू मोरला, बस चालक, वाहक तसेच RTC कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
