अहेरी विदर्भ न्यूज 24 प्रतिनिधी दिनांक:-03 फेब्रुवारी 2026
अहेरी शहरात नियमांना केराची टोपली दाखवत उभी राहिलेली आणि दीर्घकाळ चर्चेत असलेली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची वादग्रस्त पाच मजली इमारत अखेर अहेरी नगरपंचायतीने आज सकाळपासून बुलडोझरच्या साहाय्याने पाडण्यास सुरुवात केली. न्यायालयीन प्रक्रियेनंतर मिळालेली मुदत संपताच, कोणतीही स्थगिती न मिळाल्याने प्रशासनाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही ठोस आणि धडक कारवाई केली.
गडअहेरी मार्गालगत कंकडालवार यांनी खरेदी केलेल्या भूखंडावर इमारत उभारण्यासाठी नगरपंचायतीकडे परवानगी मागितली होती. मात्र राज्य महामार्गाच्या नियमानुसार आवश्यक असलेले २० मीटर अंतर किंवा रस्त्याच्या हद्दीपासून ४.५० मीटर अंतर सोडण्यास त्यांनी नकार दिला. स्पष्ट नियमांचे उल्लंघन होत असल्याने नगरपंचायतीने सुरुवातीलाच बांधकामाचा नकाशा नाकारला. तरीही परवानगीशिवाय बांधकाम सुरूच ठेवण्यात आल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील बंडखोरी आणि स्थानिक पातळीवरील राजकीय नाराजीमुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले. विरोधकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रशासनानेही या प्रकरणात गांभीर्याने दखल घेतली. नगरपंचायतीने अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिल्यानंतर कंकडालवार यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र २९ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यायालयाने त्यांच्या विरोधात निकाल देत नगरपंचायतीच्या कारवाईला वैध ठरवले.
यानंतर वरिष्ठ न्यायालयात अपील करण्यासाठी देण्यात आलेली मुदतही संपली. कोणतीही स्थगिती न मिळाल्याने अखेर आज नगरपंचायतीने थेट बुलडोझर चालवत कारवाई सुरू केली. या आधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते नियमावलीबाबत स्पष्ट माहिती घेण्यात आली होती. वारंवार नोटिसा बजावून आणि पोलीस तक्रार करूनही बांधकाम थांबवले गेले नसल्याने प्रशासनाला ही टोकाची कारवाई करावी लागल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अहेरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सकाळपासून परिसरात तणावपूर्ण शांतता असून नागरिकांची मोठी गर्दी कारवाई पाहण्यासाठी जमली होती. “नियम मोडणाऱ्यांना राजकीय पाठबळ असले तरी कारवाई अटळ आहे. अहेरी नगरपंचायत हद्दीतील कोणत्याही अनधिकृत बांधकामावर अशीच कठोर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट संदेश या कारवाईतून नगरपंचायत प्रशासनाने दिला आहे.
ही कारवाई म्हणजे अहेरीत ‘कायदा सर्वांसाठी समान’ असल्याचा ठाम इशारा मानला जात असून, पुढील काळात इतर अनधिकृत बांधकामांवरही बुलडोझर चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
#Aheri #BulldozerAction #IllegalConstruction #AjayKankadalwar #AheriMunicipalCouncil #VidarbhaNews24
