सिरोंचा विदर्भ न्यूज 24 वृत्तसंस्था दिनांक 5 फेब्रुवारी 2026
भाजप तालुका अध्यक्ष श्रीनाथ राऊत यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी मागणी
राष्ट्रीय महामार्ग 63 अंतर्गत येणाऱ्या नडीकुडा बस स्टॉप ते आसरअल्ली बस स्टॉप दरम्यानचा रस्ता अक्षरशः खड्ड्यांच्या गर्तेत सापडला असून वाहनचालकांसाठी हा मार्ग जीवघेणा ठरत आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने संपूर्ण महामार्ग खड्डेमय झाला असून, रोज अपघाताला आमंत्रण देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या गंभीर विषयाकडे लक्ष वेधत भारतीय जनता पार्टीचे सिरोंचा तालुका अध्यक्ष श्रीनाथ राऊत यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, सिरोंचा येथील मुख्य कार्यकारी अभियंत्यांना दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी लेखी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, नडीकुडा ते आसरअल्ली या दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनधारकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांसाठी हा रस्ता धोकादायक बनला असून, अपघातांची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे.
विशेष म्हणजे, हा महामार्ग स्थानिक नागरिक, विद्यार्थी, शेतकरी तसेच व्यापाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतानाही संबंधित विभागाकडून दुरुस्तीच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. पावसाळ्यापूर्वीच रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने आगामी काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, श्रीनाथ राऊत यांनी “तात्काळ खड्डे बुजवून महामार्गाची दुरुस्ती करावी” अशी ठाम मागणी निवेदनातून केली आहे. अन्यथा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊन प्रशासनाची जबाबदारी ठरेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.
आता सार्वजनिक बांधकाम विभाग या निवेदनाची दखल घेऊन तातडीने कारवाई करणार का, की नेहमीप्रमाणे अपघात घडल्यावरच जाग येणार, असा सवाल स्थानिक जनतेतून उपस्थित केला जात आहे.
#VidarbhaNews24
#NH63
#Sironcha
#RoadCondition
#PublicWorksDepartment
#BJP
#SrinathRaut
#Gadchiroli
#PotholeIssue
#PublicSafety