गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:- 4 फेब्रुवारी 2026
मुख्याध्यापक-अधीक्षक निलंबित, कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली; मात्र पुरवठादार ‘सेफ’*
भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून, अखेर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत मोठी कारवाई केली आहे. कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचा ठपका ठेवत शाळेचे मुख्याध्यापक डी. जी. रापंजी आणि अधीक्षक एम. एम. पाटील यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
याचबरोबर, शाळेतील अधिक्षिका व पाच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याचे आदेश भामरागडचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे आश्रमशाळा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
७० विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात धावपळ
२८ जानेवारी रोजी दुपारच्या जेवणानंतर लाहेरी आश्रमशाळेतील तब्बल ७० विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. परिस्थिती गंभीर होताच विद्यार्थ्यांना तातडीने लाहेरी, भामरागड व अहेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
“शाळा म्हणजे शिक्षणाचं मंदिर की आजारांचं केंद्र?” असा सवाल या घटनेनंतर उपस्थित झाला.
स्वयंपाकगृहात घाण, सडलेले धान्य-भाजीपाला आढळला
या घटनेनंतर स्थानिक आमदार डॉ. नरोटे यांनी शाळेला भेट देत दुरवस्थेबाबत तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांनी प्रत्यक्ष शाळेची पाहणी केली असता, अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या.
शाळेच्या स्वयंपाकगृहात कमालीची अस्वच्छता, तसेच विद्यार्थ्यांसाठी ठेवलेली फळे, धान्य व भाजीपाला सडलेल्या अवस्थेत आढळून आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ होत असल्याचे स्पष्ट झाले.
निलंबनानंतर मुख्यालय ठरले, तात्पुरता प्रभार दिला
निलंबन काळात मुख्याध्यापक डी. जी. रापंजी यांचे मुख्यालय जांबिया (एटापल्ली), तर अधीक्षक एम. एम. पाटील यांचे मुख्यालय हालेवारा येथे निश्चित करण्यात आले आहे.
दरम्यान, रिक्त झालेल्या पदांचा तात्पुरता प्रभार उच्च माध्यमिक शिक्षक आर. एन. हारमे आणि वरिष्ठ लिपिक वैभव देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आला आहे
प्रशासनाचा इशारा स्पष्ट, पण पुरवठादारावर कारवाई केव्हा?
या कारवाईनंतर प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.
मात्र, गंभीर बाब म्हणजे आश्रमशाळेला अन्नपुरवठा करणाऱ्या संबंधित पुरवठादारावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे “खापर फक्त कर्मचाऱ्यांवर, की मुळ दोषींवरही कारवाई होणार?” असा सवाल उपस्थित होत आहे.
विदर्भ न्यूज 24 ही संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुढील कारवाई होते की नाही, याचा पाठपुरावा करत राहणार आहे.
