गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी दिनांक :- 04 फेब्रुवारी 2026
बोगाटोला जंगलातील खुनप्रकरण उघड; पाच आरोपी अटकेत
मौजा बोगाटोला, ता. कोरची येथील जंगल परिसरात अज्ञात इसमाचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. अत्यंत गंभीर आणि गुंतागुंतीच्या या खुनप्रकरणाचा छडा लावत गडचिरोली पोलिसांनी अवघ्या 72 तासांत पाच आरोपींना अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
दि. 31 जानेवारी 2026 रोजी जंगल परिसरात मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था कुजलेली असल्याने ओळख पटवणे व तपास करणे मोठे आव्हान ठरले. मात्र, पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन कोरची व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांनी संयुक्तपणे तपास सुरू केला.
तपासादरम्यान वैद्यकीय अहवालानुसार मृत्यू धारदार शस्त्राने मानेवर वार केल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर दि. 02 फेब्रुवारी 2026 रोजी पो.स्टे. कोरची येथे अप.क्र. 19/2026 भादंवि कलम 103(1), 238 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहिती व घटनास्थळावरील दुव्यांच्या आधारे तपास पुढे नेताना धक्कादायक वास्तव समोर आले. शानु पठाण याचे मयत जितू कवंर (वय 30) याच्या पत्नीसोबत अवैध प्रेमसंबंध होते. या संबंधांमध्ये जितू कवंर अडथळा ठरत असल्याने पूर्वनियोजित कट रचून त्याचा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.
जितू कवंर हा खुर्शीपार, ता. कोरची येथे आलेला असताना, आरोपी शानु पठाण याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला आणि मृतदेह जंगलात पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे —
शानु पठाण (वय 36),पुंकेश बोरकर (वय 32),चंद्रशेखर गुज्जेवार (वय 27)धनपाल मडावी (वय 21)सर्व रा. जांभुळखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली,सोनाली कवंर (वय 25) रा. जेठकन्हार, ता. डोंगरगड, जि. राजनांदगाव (छ.ग.),दि. 04 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व आरोपींना अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पो.नि. शैलेंद्र ठाकरे (पोलीस स्टेशन कोरची) करीत आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कार्तिक मधीरा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपासात स्थागुशा गडचिरोलीचे पो.नि. अरुण फेगडे, पो.नि. शैलेंद्र ठाकरे, सपोनि. मुकुंद देशमुख, पोउपनि. विकास चव्हाण तसेच कोरची पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
गडचिरोली पोलिसांची ही कारवाई म्हणजे “क्राईम कितीही गुंतागुंतीचा असो, पोलिसांच्या नजरेतून सुटत नाही” याचा ठोस पुरावा आहे.
