भामरागड | प्रतिनिधी | दि. २८ जुलै २०२६
गडचिरोली जिल्ह्यात माओवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके लावून नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी पिपली-बुर्गी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशाच प्रकारच्या प्रकरणात कारवाई केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली असून, नक्षलवादाच्या नावाखाली कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील माओवादाचा प्रभाव संपुष्टात आणण्यासाठी पोलीस दलाने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने विशेष मोहिमा राबविल्या आहेत. “ऑपरेशन अंतिम प्रहार” या व्यापक मोहिमेद्वारे जिल्ह्यातील माओवादी कारवायांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात आले असून, जिल्हा पोलीस अभिलेखावर सध्या एकही सक्रिय माओवादी शिल्लक नसल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे.
याच पार्श्वभूमीवर दि. २५ जुलै २०२६ रोजी पोमके-फुलणार परिसरातील हिद्दुर-दोबुर मार्गावर दोन झाडांदरम्यान लाल रंगाचा कापडी बॅनर आणि पांढऱ्या रंगाचे पत्रक आढळून आले. या बॅनर व पत्रकांवर माओवादी संघटनेच्या नावाने मजकूर लिहून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ही बाब समोर येताच गडचिरोली पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली.
पोलीसांनी तांत्रिक पुरावे, गुप्त माहिती आणि स्थानिक पातळीवरील तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान जोगा रैनु धुर्वा (रा. मिरगुळवंचा), मालु कांडे धुर्वा (रा. मिरगुळवंचा), दलसु मर्रा तेलामी (रा. कृष्णार), चैतु डूंगा धुर्वा (रा. दोबुर), गणेश देवू आलामी (रा. पोयारकोठी) आणि राजेश दल्लु वड्डे (रा. मिरगुळवंचा) या सहा जणांनी माओवादी असल्याचे भासवून सदर बॅनर व पत्रके लावल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून, या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
या प्रकरणी कोठी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा (UAPA) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून, या कटामागील इतर व्यक्तींचाही शोध घेण्यात येत आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच नागरिकांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की, “नक्षल सप्ताह किंवा माओवादाच्या नावाखाली कोणत्याही अफवा, भूलथापा अथवा दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला बळी पडू नका. अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी होऊ नका. समाजात भीती आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.”
गडचिरोली पोलिसांच्या या सलग दोन कारवायांमुळे नक्षलवादाच्या नावाखाली नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला असून, जिल्ह्यात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन कोणतीही तडजोड करणार नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
— VIDARBHA NEWS 24 NETWORK
विदर्भाची शान • गडचिरोलीचा अभिमान
