गडचिरोली प्रतिनिधी विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक 28 जुलै 2026
भारतीय हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यासाठी दिनांक २९ जुलै २०२६ रोजी रेड अलर्ट आणि ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केल्याने जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना एक दिवसाची सुटी जाहीर केली आहे.
जिल्ह्यातील अंगणवाड्या, शासकीय व खासगी प्राथमिक-माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) तसेच इतर सर्व व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांनाही हा आदेश लागू राहणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, बांडिया आणि इंद्रावती या प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक ठिकाणी नाले-नाल्यांना पूर येऊ शकतो. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे तसेच नदी, नाले व पूरग्रस्त भागाजवळ जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
याशिवाय संबंधित आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ तसेच इतर लागू असलेल्या कायद्यांनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
जिल्हा प्रशासनाने सर्व शैक्षणिक संस्था, पालक आणि नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, पुढील हवामान स्थितीनुसार आवश्यक ते निर्णय घेतले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
– विदर्भ न्यूज 24 नेटवर्क
