गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक- 06फेब्रुवारी 2026
छत्तीसगड–महाराष्ट्र सीमेवरील अतिसंवेदनशील अबुजमाड जंगल परिसरात सुरू असलेल्या संयुक्त शोध व नक्षलविरोधी अभियानादरम्यान सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आणखी दोन माओवादी ठार झाल्याची माहिती आज सकाळी समोर आली आहे. घटनास्थळावरून आज सकाळी एक पुरुष व एक महिला असे दोन माओवादी मृतदेह हस्तगत करण्यात आले असून, याआधी एक माओवादी ठार झाला होता. त्यामुळे आतापर्यंत एकूण तीन माओवादी (२ पुरुष, १ महिला) ठार झाले आहेत.
मृत माओवाद्यांकडून १ एके-४७ रायफल व १ एसएलआर शस्त्र जप्त करण्यात आले असून, तिन्ही माओवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू असल्याने आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या चकमकीदरम्यान C-60 दलाचे जवान दिपक चिन्ना मडावी (वय ३८) हे गंभीर जखमी झाले होते. ते सध्या अहेरी येथे वास्तव्यास होते, तर त्यांचा मूळ पत्ता मांड्रा, दामरांचा, तालुका अहेरी असा आहे. आज पहाटे त्यांना अबुजमाडच्या घनदाट जंगलातून हेलिकॉप्टरच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय, भामरागड येथे दाखल करण्यात आले. मात्र, अभियानादरम्यान झालेल्या गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी लढताना त्यांनी वीरमरण पत्करले.
या अभियानात आणखी एक जवान जोगा मडावी (रा. किष्टयापल्ली) हेही रात्री गोळी लागून जखमी झाले होते. त्यांनाही हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरक्षितपणे बाहेर काढून भामरागड येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, पुढील उपचारासाठी त्यांना लवकरच हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे हलवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अबुजमाडच्या दुर्गम व घनदाट जंगल परिसरात अजूनही शोध मोहीम तीव्र स्वरूपात सुरू असून, गडचिरोली पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. अभियानासंदर्भात पुढील अधिकृत माहिती वेळोवेळी देण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
