Doctor visit a patient lying in a intensive care hospital bed. Health worker examine patients health in clinic. Hospitalization concept. Vector illustration
विशेष संपादकीय दिनांक 14 फेब्रुवारी 2026
गडचिरोली जिल्ह्याच्या नकाशावर अहेरी, सिरोंचा, मूलचेरा एट्टापल्ली, भामरागड, हेमलकसा ही नावं केवळ भौगोलिक नाहीत, तर राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची खरी परीक्षा आहेत. अलीकडेच राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प ला भेट देत पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीने माध्यमांत सकारात्मक चित्र रंगवले गेले; मात्र या झगमगाटामागे दडलेलं वास्तव आजही तितकंच विदारक आहे—अहेरी विधानसभा क्षेत्रातील आरोग्य विभाग अक्षरशः सलाईनवर आहे.
लोकबिरादरी प्रकल्प म्हणजे शासन अपयशावर उभा राहिलेला मानवतेचा किल्ला. तब्बल ५२ वर्षे अत्यंत दुर्गम, नक्षलग्रस्त आणि मूलभूत सुविधांविना असलेल्या भागात डॉ. आमटे दांपत्याने आरोग्य, शिक्षण आणि समाजसेवेचा व्रतस्थ प्रवास केला. सुरुवातीच्या २२ वर्षांत वीज नव्हती, रस्ते नव्हते, संरक्षण नव्हते—तरी सेवा थांबली नाही. आज परिस्थिती बदलली आहे, वीज आहे, इमारती आहेत, योजना आहेत; पण डॉक्टर नाहीत, तज्ज्ञ नाहीत, मनुष्यबळ नाही. हा विरोधाभासच शासनाच्या धोरणात्मक अपयशावर बोट ठेवतो.
अहेरी, भामरागड परिसरात सर्पदंश हा अपवाद नाही तर रोजचा धोका आहे. जंगल, शेती आणि उपजीविकेच्या शोधात फिरणाऱ्या आदिवासी कुटुंबांसाठी सर्पदंश म्हणजे मृत्यूशी झुंज. डॉ. आमटे यांनी सर्पदंशावरील औषधोपचारासाठी विशेष सवलत व अधिक सक्षम सुविधा मागितल्या, याचा अर्थ एकच—आजही त्या सुविधा अपुऱ्या आहेत. जर लोकबिरादरीसारख्या प्रकल्पातही ही गरज भासत असेल, तर शासकीय रुग्णालयांची अवस्था काय असेल, याची कल्पनाच पुरेशी आहे.
मंत्र्यांनी भामरागड ग्रामीण रुग्णालय आणि अहेरी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. इमारती, खाटा, नोंदी—सगळं तपासलं. पण खरा प्रश्न हा आहे की या रुग्णालयांत तज्ज्ञ डॉक्टर किती? भूलतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, आपत्कालीन सेवा देणारे डॉक्टर नियमित उपलब्ध आहेत का? अनेक पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. रुग्णवाहिका आहेत, पण चालक नाहीत किंवा इंधन नाही. औषधसाठा कागदावर पुरेसा, प्रत्यक्षात अपुरा. ही व्यवस्था आजार बरा करण्याऐवजी केवळ आकडे सांभाळण्यात गुंतलेली दिसते.
दुर्गम भागातील महिलांसाठी प्रसूती हा आजही जीवघेणा प्रवास आहे. वेळेवर रुग्णालय गाठता न आल्याने माता व बालमृत्यूची भीती कायम आहे. अशा परिस्थितीत “दौरा करून समस्यांची माहिती घेतली” एवढ्यावर समाधान मानणे म्हणजे जखमेवर मलमही न लावता फक्त पाहणी करून निघून जाण्यासारखे आहे. प्रश्न सुटत नाहीत, फक्त पुढील दौऱ्यापर्यंत ढकलले जातात.
आरोग्यमंत्री म्हणतात, शासन कटिबद्ध आहे. पण कटिबद्धता भाषणात नाही, निर्णयात दिसायला हवी. दुर्गम भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांसाठी विशेष प्रोत्साहन, सुरक्षितता, निवासी सुविधा, शिक्षण व कुटुंबीयांसाठी सवलती—या सगळ्या गोष्टी कागदावर नाही तर जमिनीवर उतरल्या पाहिजेत. अन्यथा शहरात बसून आखलेल्या योजना अहेरीच्या जंगलात पोहोचण्याआधीच दम तोडतात.
आज अहेरीतील आरोग्य विभागाबाबत “आरोग्य सलाईनवर आहे” अशी उपमा वापरली जाते. ही उपमा अतिशयोक्ती नाही, तर वास्तवाचं वर्णन आहे. सलाईन लावून रुग्ण जिवंत ठेवता येतो, पण बरा होत नाही. तसंच, दौरे, आढावे आणि आश्वासने देऊन व्यवस्था जिवंत ठेवता येते, पण सक्षम होत नाही.
लोकबिरादरी प्रकल्पाने दाखवून दिलं आहे की इच्छाशक्ती असेल तर प्रतिकूलतेवर मात करता येते. आता प्रश्न शासनाला आहे—आपण केवळ प्रेरणा घेणार आहोत की जबाबदारीही स्वीकारणार? कारण इतिहासात दौऱ्यांची नोंद राहत नाही; व्यवस्था बदलली, तेव्हाच इतिहास घडतो. अहेरीच्या आरोग्य यंत्रणेला आज भेटींची नव्हे, तर ठोस निर्णयांची गरज आहे—आणि ती गरज आता पुढे ढकलण्याइतकी वेळ शिल्लक नाही.
सिरोंचा : उपचार नाहीत, फक्त ‘रेफर’ची पावती
सिरोंचा तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचे आजचे वास्तव अत्यंत विदारक आहे. इथे रुग्ण बरा करण्याची यंत्रणा उरलेली नाही; उरली आहे ती केवळ “रेफर टू मंचिर्याल” ही सवय. लहान आजार असो वा गंभीर आपत्कालीन स्थिती—बहुतेक प्रत्येक रुग्णाला मंचिर्याल (तेलंगाना) येथे पाठवले जाते.
हा प्रकार केवळ वैद्यकीय मर्यादा नसून महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचे अपयश दर्शवतो. दुसऱ्या राज्यात उपचारासाठी जाणे हे आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीयदृष्ट्या गरीब आदिवासी रुग्णांसाठी जवळजवळ अशक्य आहे. परिणामी अनेक रुग्ण उपचार न मिळताच परततात, तर काहींचा जीव या रेफर संस्कृतीत हरवतो.
सिरोंच्याला आज गरज आहे दौऱ्यांची नाही, तर तज्ज्ञ डॉक्टरांची, सक्षम रुग्णालयांची आणि “रेफर नव्हे, उपचार” या स्पष्ट धोरणाची. अन्यथा हा तालुका आरोग्य सेवांचा भाग न राहता, फक्त दुसऱ्या राज्याकडे रुग्ण पाठवणारा दुवा बनून राहील.
