कालेश्वर (जयशंकर भूपालपल्ली) तेलंगाना प्रतिनिधी दिनांक:- 15 फेब्रुवारी 2026
गोदावरी स्नान व महाकालेश्वर दर्शनासाठी दिवसभर प्रचंड गर्दी
आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर कालेश्वर संपूर्णतः शिवमय झाले आहे. सिरोंचा तालुका मुख्यालयापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर, तेलंगणा राज्यातील जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यात वसलेले सुप्रसिद्ध कालेश्वरम महाकालेश्वर मंदिर आज पहाटेपासूनच भाविकांच्या प्रचंड गर्दीने फुलून गेले आहे. मंदिर परिसर, गोदावरी घाट, दर्शन क्यू लाईन्स आणि संपूर्ण कालेश्वर क्षेत्रात ‘हर हर महादेव’चा जयघोष घुमत होता.
आज पहाटे चार वाजल्यापासून तेलंगणा, महाराष्ट्र व छत्तीसगड राज्यांतून हजारो भाविक कालेश्वरमध्ये दाखल झाले. भाविकांनी पहिल्यांदा गोदावरी नदी येथे पवित्र स्नान करून महाकालेश्वराच्या दर्शनासाठी मंदिरात रांगा लावल्या. जगात एकमेव मानल्या जाणाऱ्या दोन पिढ्यांच्या—‘काल’ आणि ‘ईश्वर’—स्वरूपातील शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे दर्शन घेतल्यास मोक्ष प्राप्ती होते, अशी दृढ श्रद्धा भाविक व्यक्त करत होते.
दिवसभर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ऊन, गर्दी आणि प्रतीक्षा असूनही भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. मंदिर प्रशासनाकडून अतिरिक्त क्यू लाईन्स सुरू करण्यात आल्या होत्या. क्यू लाईनमधील भाविकांसाठी पिण्याचे पाणी, मठ्ठा व फळांचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.
महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. दिवसभर रुद्राभिषेक, अभिषेक, मंत्रोच्चार आणि विविध धार्मिक विधींमुळे वातावरण भक्तीमय झाले. सायंकाळी भजन-कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले, तर रात्री शुभानंद मुक्तीश्वर कल्याण सोहळा, लिंगोद्भव काल पूजा आणि चंडी होम पाहण्यासाठी भाविकांची गर्दी आणखी वाढली. यंदा आयोजित केलेला तेप्पोत्सव भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत असून, त्रिवेणी संगम तीरावरचा हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली आहे.
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता पोलीस प्रशासन व मंदिर समितीकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मार्गदर्शन, स्वयंसेवकांची मदत आणि सतत देखरेख करण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
महाशिवरात्रीच्या पावन दिवशी कालेश्वरमध्ये जमलेली ही प्रचंड गर्दी पाहता श्रद्धा, परंपरा आणि शिवभक्तीचा हा महासंगम असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. मोक्ष आणि मुक्तीच्या या पवित्र क्षेत्रात आजचा दिवस भाविकांसाठी अविस्मरणीय ठरत असून, संपूर्ण कालेश्वर परिसर ‘महादेवमय’ झाला आहे. 🔱

