सिरोंचा प्रतिनिधी (विदर्भ न्यूज 24) दिनांक 15 फेब्रुवारी 2026
सिरोंचा तालुक्यापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर वसलेल्या सोमनूर येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भरणारी यात्रा ही केवळ धार्मिक उत्सव न राहता श्रद्धा, परंपरा आणि निसर्गसौंदर्य यांचा अद्भुत संगम ठरते. येथे असलेल्या प्राचीन शिवलिंगाला विशेष धार्मिक महत्त्व असून, याच ठिकाणी प्राणहिता नदी, गोदावरी नदी (महाराष्ट्र–तेलंगणा सीमाभागातून) आणि इंद्रावती नदी (छत्तीसगडहून येणारी) या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम होतो.
भाविकांमध्ये अशी दृढ श्रद्धा आहे की, महाशिवरात्रीच्या दिवशी या त्रिवेणी संगमात डुबकी लावल्यास सर्व पापांचे क्षालन होते. याच श्रद्धेमुळे गेल्या अनेक दशकांपासून या दिवशी महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यांतून हजारो भाविक सोमनूरकडे धाव घेतात. संगमात स्नानानंतर भाविक किनाऱ्यालगत असलेल्या आतील पहाडीवर वसलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतात. या दिवशी परिसरात पूजासाहित्य, प्रसाद, खेळणी, खाद्यपदार्थ तसेच विविध मनोरंजनाची दुकाने थाटलेली दिसून येतात.
यंदाही महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मात्र, भाविकांची प्रचंड गर्दी असूनही मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवला. रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त, आरोग्य सेवा याबाबत प्रशासनाकडून ठोस व्यवस्था नसल्याने भाविकांत नाराजी व्यक्त होत आहे. अनेक वेळा प्रसारमाध्यमांतून तसेच थेट शासनाकडे मागणी करूनही या तीर्थक्षेत्राकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उपस्थित भाविकांनी केला.
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना राजे अमरीशराव आत्राम यांच्या माध्यमातून सोमनूरसाठी काही प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यांनी स्वतः सोमनूरला भेट देऊन विकासकामांचा आढावा घेतला होता. मात्र, त्या निधीचा अपेक्षित उपयोग न होता ठेकेदार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कामांचा दर्जा खालावला, तसेच काही ठिकाणी निधीच्या दुरुपयोगाचे आरोपही झाले. त्यानंतर आजपर्यंत या ठिकाणी ना लोकप्रतिनिधींची ठोस पावले पडली, ना विकासकामांची गती वाढली.
आज सोमनूरचा त्रिवेणी संगम हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असूनही तो केवळ यात्रेपुरता मर्यादित राहिला आहे. त्यामुळे सोमनूरला पर्यटन केंद्र व अधिकृत तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करून शासनाने विशेष निधी उपलब्ध करावा, पायाभूत सुविधा उभाराव्यात, सुरक्षितता व स्वच्छतेची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी भाविक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
श्रद्धा, परंपरा आणि निसर्गसंपदेचा संगम असलेला सोमनूर जर नियोजनबद्ध पद्धतीने विकसित झाला, तर तो केवळ सिरोंचा तालुक्याचाच नव्हे तर संपूर्ण विदर्भ व सीमावर्ती राज्यांसाठी एक महत्त्वाचे धार्मिक-पर्यटन केंद्र ठरू शकतो. आता तरी शासन आणि प्रशासन जागे होणार का, हाच प्रश्न उपस्थित होत आहे.
