गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक 10 मे 2026
गडचिरोली तालुक्यातील मौजा मेंढा येथे घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा अवघ्या 12 तासांत उलगडा करण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश आले आहे. तांत्रिक पुरावे, गोपनीय माहिती आणि वेगवान तपासाच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 8 मे 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास मौजा मेंढा, ता. गडचिरोली येथे अक्षय भानारकर यांच्या राहत्या घरी शामकला सुखदेव किरंगे (रा. हिडदा, ता. कुरखेडा) यांचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये अप क्र. 578/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 103 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत तपासाला गती देण्याचे निर्देश दिले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन गडचिरोली आणि स्थानिक गुन्हे शाखेची विशेष तपास पथके तयार करण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक पुरावे, मोबाईल लोकेशन, संशयितांच्या हालचाली तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयित सुदामा रामभाऊ चौधरी याला चंद्रपूर येथून ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने पूर्ववैमनस्यातून शामकला किरंगे यांचा खून केल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी सुदामा रामभाऊ चौधरी (वय 33, रा. शिरसगाव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) आणि चेतन धर्माराव खोबरागडे (रा. इंदिरानगर, ता. जि. गडचिरोली) यांना मोठ्या शिताफीने अटक केली. तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका विधीसंघर्षित बालकाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू असून विधीसंघर्षित बालकाला बाल न्याय मंडळासमोर सादर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे करीत आहेत.
या संपूर्ण कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगतसिंग दुलत, पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोउपनिरीक्षक शिवाजी देशमुख, माधुरी मिसाळ, भावना राऊत तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अत्यंत कमी वेळेत गंभीर गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना अटक करण्यात यश मिळाल्याने पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी संपूर्ण तपास पथकाचे विशेष कौतुक केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडूनही पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे स्वागत केले जात आहे.
