सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक 10 मे 2026
गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने “रस्ते अपघात शून्यावर आणण्याचा संकल्प” या उद्देशाने सिरोंचा उपविभागात व्यापक रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. दि. 10 मे 2026 रोजी मा. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या संकल्पनेतून तसेच मा. अप्पर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
या अभियानात सिरोंचा उपविभागातील पोलीस स्टेशन सिरोंचा, असरअली, पातागुडम तसेच उपपोलीस स्टेशन बामणी, झिंगानूर व रेगुंठा येथील अधिकारी आणि अंमलदारांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली.
अभियानांतर्गत विविध भागांतून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान वाहन चालकांना सुरक्षित वाहन चालविण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. वाहन चालविताना वेगमर्यादेचे पालन करणे, हेल्मेट व सीटबेल्टचा नियमित वापर करणे, तसेच मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
यावेळी अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. “गोल्डन अवर”मध्ये मदत मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात, याबाबतही जनजागृती करण्यात आली. वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याने चालकांनी वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
रॅलीदरम्यान रात्रीच्या वेळी वाहन स्पष्ट दिसावीत आणि अपघात टाळता यावेत यासाठी अनेक वाहनांवर रिफ्लेक्टर स्टिकर्स लावण्यात आले. ग्रामीण व दुर्गम भागात रिफ्लेक्टरचा वापर अपघात नियंत्रणासाठी महत्त्वाचा ठरतो, असे पोलिसांनी सांगितले.
संपूर्ण अभियानादरम्यान नागरिकांना खालील महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या –
- मद्यपान करून वाहन चालवू नये
- वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा
- हेल्मेटचा वापर अनिवार्यपणे करावा
- वेगमर्यादेचे काटेकोर पालन करावे
गडचिरोली पोलिस दलाने सर्व नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःचा व इतरांचा जीव सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये वाहतूक सुरक्षेविषयी जागरूकता वाढण्यास मदत होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
