सिरोंचा (विदर्भ न्यूज 24 ब्यूरो): दिनांक 11 मे 2026
सिरोंचा नगरपंचायतीतील आगामी नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार श्रीमती भोगे पद्मा सत्यनारायण यांच्या नावाची. नगरपंचायतीतील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांचा प्रभाव वाढत असल्याचे चित्र दिसत असून, “पद्मा ताईंचा पगडा भारी” असल्याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे.
अविश्वास ठरावानंतर नगरपंचायतीतील सत्ता समीकरण पूर्णपणे बदलले. त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी विविध गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत शांतपणे पण प्रभावी रणनीती आखत पद्मा भोगे यांनी स्वतःचे राजकीय वजन वाढवल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, पद्मा भोगे या पूर्वी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी माजी मंत्री व आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या या राजकीय बदलानंतर स्थानिक पातळीवर त्यांचा संपर्क आणि प्रभाव अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे.
नगरपंचायतीतील काही महत्त्वाच्या नगरसेवकांशी त्यांचे चांगले संबंध असल्याची चर्चा असून, अंतिम क्षणी अनेक मतांचे गणित त्यांच्या बाजूने झुकू शकते, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे सुरुवातीला दुय्यम मानली गेलेली त्यांची उमेदवारी आता अचानक केंद्रस्थानी आली आहे.
सिरोंचा शहरात सध्या “कोण होणार नगराध्यक्ष?” यापेक्षा “पद्मा ताई गेम फिरवणार का?” याचीच चर्चा अधिक रंगताना दिसत आहे. अनेक ठिकाणी गुप्त बैठका, संपर्क मोहिमा आणि राजकीय हालचाली सुरू असून, प्रत्येक गटाकडून संख्या बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, नगराध्यक्ष निवडीसाठी १२ तारखेला होणारी विशेष सभा अत्यंत निर्णायक ठरणार आहे. त्यात कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात बहुमत पडते, यावर पुढील राजकीय दिशा ठरणार आहे. मात्र सध्याच्या घडीला राजकीय वातावरण पाहता पद्मा भोगे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा वेगाने पसरत आहे.
👉 आता नजर १२ तारखेवर — पद्मा ताईंचा ‘राजकीय मास्टरस्ट्रोक’ यशस्वी ठरणार का?
#पद्मा_भोगे #सिरोंचा #नगराध्यक्ष #नगरपंचायत #राजकारण #BreakingNews #VidarbhaNews24 #AjitPawarNCP #Gadchirol
