सिरोंचा (विदर्भ न्यूज 24 ब्यूरो): दिनांक 12 मे 2026
सिरोंचा नगरपंचायतीतील राजकीय घडामोडींना निर्णायक वळण मिळाले असून, नगराध्यक्षपदाची निवड अविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या श्रीमती पद्मा भोगे सत्यनारायण यांची नगराध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे आता संपूर्ण शहराचे लक्ष नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीकडे लागले आहे.
अविश्वास ठरावानंतर नगरपंचायतीतील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलले. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांविरोधातील ठराव मंजूर झाल्यानंतर नवीन नेतृत्व निवडीची प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणात होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात दोन उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने पद्मा भोगे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले.
विशेष म्हणजे, पद्मा भोगे या पूर्वी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी माजी मंत्री व आमदार धर्मराव बाबा यांचा नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करत नगरपंचायतीतील राजकीय समीकरणांमध्ये स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले. अविश्वास ठरावानंतर त्यांच्या बाजूने वाढत गेलेला पाठिंबा आणि पडद्यामागील राजकीय हालचाली यामुळे त्यांचे पारडे सुरुवातीपासूनच जड मानले जात होते.
आता मात्र राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा उपाध्यक्षपदाच्या निवडीची सुरू झाली आहे. नगराध्यक्षपद एका गटाकडे गेल्यानंतर उपाध्यक्षपद कोणत्या गटाला मिळणार, यावरून विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. काही नगरसेवकांची नावे चर्चेत असली तरी अधिकृत पातळीवर अद्याप कोणतेही नाव पुढे आलेले नाही.
नगरपंचायतीतील सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक नगरसेवकाचे राजकीय महत्त्व वाढले असून, पुढील काही दिवसांत गुप्त बैठका, संपर्क मोहिमा आणि राजकीय रणनीतींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे. सत्ता संतुलन राखण्यासाठी विविध गटांमध्ये समन्वयाचे प्रयत्न सुरू असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, शहरातील नागरिकांचेही लक्ष आता उपाध्यक्षपदाच्या निवडीकडे लागले आहे. नवीन नेतृत्व शहराच्या विकासाला किती गती देणार, प्रलंबित प्रश्न कसे सोडवणार आणि नगरपंचायतीत स्थिरता निर्माण होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
👉 एकूणच, नगराध्यक्षपदाचे चित्र स्पष्ट झाले असले तरी उपाध्यक्षपदाची निवड आता सिरोंचा नगरपंचायतीतील पुढील राजकीय दिशा ठरवणार आहे.
#सिरोंचा #नगराध्यक्ष #उपाध्यक्ष #पद्मा_भोगे #नगरपंचायत #BreakingNews #VidarbhaNews24 #राजकारण #Gadchiroli
