गडचिरोली, विशेष प्रतिनिधी दिनांक:-15/03/2026
घरगुती गॅस सिलिंडरची अवैध साठवणूक व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली असून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानुसार आज जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली विशेष तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकूण ११२ ठिकाणी तपासण्या व छापे टाकण्यात आले.
या धडक कारवाईदरम्यान प्रामुख्याने व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर तसेच अनधिकृत साठवणूक यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
*तालुकानिहाय कारवाईचा आढावा :*
या मोहिमेत सर्वाधिक तपासण्या गडचिरोली (३०) आणि धानोरा (२२) तालुक्यांत करण्यात आल्या. तपासणीदरम्यान पुढीलप्रमाणे गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले –
गडचिरोली तालुका : २ गॅस सिलिंडर जप्त (मूल्य सुमारे ₹६,०००)
चामोर्शी तालुका : १ गॅस सिलिंडर जप्त (मूल्य सुमारे ₹३,०००)
मुलचेरा तालुका : १ गॅस सिलिंडर जप्त (मूल्य सुमारे ₹३,७६०)
या कारवाईत जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकूण ४ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून जप्त केलेल्या मालाचे एकूण मूल्य ₹१२,७६० इतके आहे.
*फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू :*
अवैध साठवणूक व वापर आढळलेल्या प्रकरणांमध्ये संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
मुलचेरा येथे १ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गडचिरोली व चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गॅस सिलिंडरचा काळाबाजार, अवैध साठवणूक किंवा व्यावसायिक वापर आढळल्यास नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला असून जिल्ह्यात ही तपासणी मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
0000
