गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक 15 मार्च 2026
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान व अवकाश संशोधनाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेतर्फे आयोजित शैक्षणिक दौर्याअंतर्गत जिल्ह्यातील ५० गुणवंत विद्यार्थ्यांनी व १० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बेंगळुरू येथील इस्रो (Indian Space Research Organisation) ला शैक्षणिक भेट दिली. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील प्रगतीची जवळून माहिती मिळाली.
भेटीदरम्यान इस्रोच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना संस्थेची कार्यपद्धती, भारताच्या महत्त्वपूर्ण अवकाश मोहिमा तसेच भविष्यातील योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. विशेषतः चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाची माहिती तसेच आगामी चांद्रयान-४ मोहिमेबाबतचे नियोजन विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मानवी अंतराळ मोहिमेबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या भेटीत विद्यार्थ्यांना उपग्रह तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे समजावून सांगण्यात आली. उपग्रहाची रचना कशी केली जाते, त्यामध्ये विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सेन्सर्स, कम्युनिकेशन प्रणाली आणि सोलर पॅनेल्स कशाप्रकारे बसवले जातात याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर उपग्रहाचे असेंब्ली कशी केली जाते आणि अंतराळातील कठीण परिस्थितीत कार्य करण्यासाठी त्यावर व्हायब्रेशन टेस्ट, थर्मल टेस्ट आणि व्हॅक्यूम टेस्ट यांसारख्या कठोर तांत्रिक चाचण्या कशा घेतल्या जातात हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
याशिवाय उपग्रहाला रॉकेटमध्ये बसवून प्रक्षेपण प्रक्रिया कशी पार पडते, रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत पोहोचल्यानंतर उपग्रह वेगळा कसा होतो आणि तो पृथ्वीभोवती ठराविक कक्षेत फिरत कसा कार्य करतो याची माहिती देण्यात आली. उपग्रह पृथ्वीवरील ग्राउंड स्टेशनशी संपर्क साधून हवामान अंदाज, संचार सेवा, नकाशे तयार करणे, आपत्ती व्यवस्थापन तसेच वैज्ञानिक संशोधनासाठी महत्त्वपूर्ण माहिती कशी पाठवतो याचेही मार्गदर्शन करण्यात आले.
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांसाठी संवादात्मक प्रश्नोत्तर सत्रही आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी इस्रोमध्ये करिअर करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी तसेच भविष्यातील संशोधनाच्या शक्यता याबाबत अनेक प्रश्न विचारले. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करत विज्ञान क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरित केले.
गडचिरोलीसारख्या दुर्गम व ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट देणे ही अत्यंत अभिमानास्पद व आयुष्यातील अविस्मरणीय संधी ठरली. विद्यार्थ्यांनी या भेटीदरम्यान मिळालेल्या अनुभवामुळे भविष्यात विज्ञान व संशोधन क्षेत्रात कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.
या शैक्षणिक दौर्याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनीही समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषद गडचिरोलीने ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना इस्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थेला भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिली, ही त्यांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. अशा संधीमुळे विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल, असेही पालकांनी नमूद केले.
ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार यांचे विद्यार्थ्यांनी व पालकांनी मनःपूर्वक आभार मानले. हा शैक्षणिक दौरा उपशिक्षणाधिकारी वैभव बरेकर व उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला.
या उपक्रमासाठी परिश्रम घेतलेल्या १० अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान व संशोधनाच्या नव्या दिशा दाखवणारा हा शैक्षणिक दौरा त्यांच्या शैक्षणिक व वैचारिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
