सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक:-16 मार्च 2026
सिरोंचा तालुक्यातील टेकडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत बोरेमपल्ली येथील आशा स्वयंसेविका पदाच्या भरती प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन करून पात्र उमेदवारांना डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. बोरेमपल्ली येथील रहिवासी श्रीमती शारदा रवींद्र कडार्ला यांनी तहसीलदार शिरोंच्या यांचा मार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी गडचिरोली यांच्याकडे लेखी निवेदन देत भरती प्रक्रियेचा पुनर्विचार करून न्याय देण्याची मागणी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मार्च 2026 मध्ये टेकडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आशा स्वयंसेविका पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरतीत आपण पात्र असूनही आपल्याला संधी नाकारण्यात आली असल्याचा आरोप शारदा कडाळी यांनी केला आहे. त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, त्या बोरेमपल्ली गावातील स्थानिक रहिवासी असून त्यांचा विवाह 18 जून 2021 रोजी झाला होता. मात्र दुर्दैवाने 28 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या पतीचे अपघाती निधन झाले. त्या वेळी त्या पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. पतीच्या मृत्यूनंतर सासरच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांना तेथे राहणे शक्य झाले नाही आणि त्या माहेरी परतल्या.
प्रसूतीनंतर त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर एक वर्षानंतर त्यांनी आशा स्वयंसेविका पदासाठी अर्ज केला होता. त्या वेळी झालेल्या भरती प्रक्रियेत त्यांची निवड झाल्याचा आदेश (आदेश क्रमांक 366/2025) मिळाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मात्र काही कालावधीनंतर ही भरती रद्द करण्यात आली आणि नव्याने प्रक्रिया सुरू करण्यात आली.
पुन्हा 12 मार्च 2026 रोजी मुलाखत घेण्यात आली. मात्र या मुलाखतीत त्यांची निवड न करता दुसऱ्या महिलेला प्राधान्य देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाले असून पात्र उमेदवारांवर अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शारदा कडाळी यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, त्यांच्या लहान मुलीचा सांभाळ करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही स्थिर उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे आशा स्वयंसेविका पदाची संधी मिळाल्यास त्यांना उदरनिर्वाहाचा आधार मिळेल आणि मुलीचे संगोपन करणे शक्य होईल. त्यामुळे सदर भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
यासोबतच त्यांनी आपल्या अर्जासोबत पतीचा मृत्यू दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, दहावीची गुणपत्रिका तसेच पूर्वीच्या निवडीसंबंधी आदेशपत्राची प्रत जोडली आहे.
दरम्यान, संबंधित प्रकरणात न्याय न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही शारदा कडार्ला यांनी दिला आहे. त्यामुळे आशा स्वयंसेविका भरती प्रक्रियेबाबत स्थानिक प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
