गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-03 एप्रिल 2026
“आरोग्य यंत्रणा आणि लोकसहभाग यांच्या बळावर अधिक सशक्त व निरोगी महाराष्ट्र घडविणे शक्य आहे. ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ ही मोहीम लोकचळवळ बनली पाहिजे,” असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबीटकर यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत गडचिरोली जिल्हा प्रशासन ही मोहीम पूर्ण ताकदीनिशी प्रभावीपणे राबविणार असल्याचा ठाम निर्धार मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास गाडे यांनी व्यक्त केला.
नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) सभागृहात काल आयोजित विभागीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री श्री. आबीटकर यांनी उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजनांना प्राधान्य देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘आरोग्य संपन्न ग्राम’ म्हणून मानांकन व प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी श्री. गाडे म्हणाले की, गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हे मोठे आव्हान असले तरी लोकसहभागाच्या बळावर ते साध्य करता येईल. ग्रामपातळीवरील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन कटिबद्ध असून सर्व यंत्रणांचा समन्वय साधून काम केले जाणार आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले की, दुर्गम भागात अजूनही काही ठिकाणी पारंपरिक समजुती प्रचलित आहेत. त्यामुळे या मोहिमेत गावातील पुजारी व स्थानिक मानकरी यांना सहभागी करून अंधश्रद्धा दूर करणे व नागरिकांना वैज्ञानिक उपचार पद्धतीकडे वळविणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी प्रशासकीय समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी पोलीस विभागाचाही सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. दुर्गम भागात सेवा देताना नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक आहे.
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच ‘आशा’ स्वयंसेविकांच्या माध्यमातून गावपातळीवर व्यापक जनजागृती केली जाणार असून आरोग्यदायी सवयी रुजविण्यावर भर दिला जाणार आहे.
०००
