आरमोरी (प्रतिनिधी) दिनांक 4 एप्रिल 2026
प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेत तरुणाला ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळल्याचा आणि अखेर विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आरमोरी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा उर्फ किष्णा मारोती लाड (वय २६, रा. शिक्षक कॉलनी, आरमोरी) यांचे आरोपी क्रमांक ३ असलेल्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या नात्याचा गैरफायदा घेत आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. भीतीपोटी फिर्यादीकडून वेळोवेळी सुमारे ३ ते ४ लाख रुपये उकळण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, १४ मार्च २०२६ रोजी आरोपींनी फिर्यादीकडे तब्बल १५ लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी नितिन जोध (वय ४०) व राजू अंबानी (वय ६५, दोघेही रा. नेहरू चौक, आरमोरी) यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, फिर्यादीने शेतासाठी आणलेले कीटकनाशक जबरदस्तीने पाजून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आहे.
ही घटना मौजा आरमोरी–ब्रम्हपुरी रोडलगत भुमी एम्पायर प्लॉट परिसरात घडली. याप्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात अप.क्र. ९५/२०२६ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा पोउपनि नरेश सहारे यांनी नोंदविला असून पुढील तपास मपोउपनि ज्योती राक्षे करीत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. #ArmoriNews #Gadchiroli #CrimeNews #BlackmailCase #MaharashtraNews #VidarbhaNews24
