सिरोंचा विदर्भ न्यूज 24प्रतिनिधी दिनांक:-04 एप्रिल 2026
नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ७ मध्ये कलार समाजासाठी उभारण्यात येत असलेल्या समाज भवनाचे बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृतपणे पाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, कलार समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर समस्त कलार समाजाच्या शिष्टमंडळाने आज नगर उपाध्यक्ष बबलू पाशा यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
मिळालेल्या माहितीनुसार, नगर पंचायतमार्फत सर्व अधिकृत प्रक्रिया पूर्ण करून या समाज भवनाच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली होती. टेंडर प्रक्रियेनंतर कंत्राटदाराकडून कामालाही सुरुवात झाली होती. पारंपरिक पद्धतीने भूमिपूजन करून समाज बांधवांनी उत्साहात कामाचा शुभारंभ केला होता. मात्र, ३ एप्रिल रोजी काही अज्ञात व्यक्तींनी अचानक जेसीबी आणून सुरू असलेले बांधकाम पाडले. यावेळी फाउंडेशनसाठी खणलेले गड्डेही बुजवण्यात आले.
या प्रकारात केवळ बांधकामाचे नुकसानच झाले नाही, तर गड्यांमध्ये पूजेचे साहित्यही गाडले गेले. त्यामुळे कलार समाजाच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत. हा प्रकार केवळ बेकायदेशीरच नव्हे, तर समाजाच्या श्रद्धेवर आघात करणारा असल्याची भावना व्यक्त होत आहे.
घटनेच्या निषेधार्थ आज समाजाच्या प्रतिनिधींनी नगर उपाध्यक्ष बबलू पाशा यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली. निवेदनात बंद पाडलेले बांधकाम त्वरित पुन्हा सुरू करणे, सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करणे आणि उपलब्ध व्हिडिओ पुराव्यांच्या आधारे संबंधितांची ओळख पटवून कठोर कारवाई करणे, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या.
निवेदन स्वीकारल्यानंतर बबलू पाशा यांनी समाज बांधवांना शांततेचे आवाहन करत, “हा प्रकार अत्यंत निंदनीय असून अशा प्रकारे सरकारी कामात अडथळा आणणे अजिबात सहन केले जाणार नाही. प्रशासनाकडून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे स्पष्ट आश्वासन दिले.
दरम्यान, कलार समाजाने प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. दिलेल्या मुदतीत दोषींवर ठोस कारवाई झाली नाही आणि काम पुन्हा सुरू करण्यात आले नाही, तर संपूर्ण तालुक्यातील कलार बांधव रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.
या घटनेमुळे सिरोंचा शहरात राजकीय वातावरणही तापले असून, हे कृत्य राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आता पोलीस आणि नगर पंचायत प्रशासन या प्रकरणी नेमकी कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#Sironcha #Gadchiroli #KalarSamaj #SamajBhavan #BreakingNews #VidarbhaNews2
