गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक :-02एप्रिल 2026
नियोजनबद्ध कामकाज, समन्वय आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात गडचिरोली जिल्ह्याने विकास निधी खर्चात उल्लेखनीय कामगिरी करत मार्च अखेर शंभर टक्के निधी खर्च साध्य केला आहे. तसेच महसूल वसुलीतही उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली करत यशस्वी कामगिरी नोंदविली आहे.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यात विविध योजनांअंतर्गत एकूण ६९७.०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ४५६ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत ३६ कोटी रुपये, आदिवासी उपयोजना अंतर्गत २०२.३८ कोटी रुपये तसेच आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रासाठी २.६८ कोटी रुपये असा निधी समाविष्ट होता. या संपूर्ण निधीचा शंभर टक्के वापर करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
विकास निधीचा वेळेत व प्रभावी वापर व्हावा यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सातत्याने आढावा बैठका घेत विविध यंत्रणांना निधी तातडीने खर्च करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. विभागनिहाय प्रगतीचा नियमित आढावा घेत अडचणी तत्काळ दूर करण्यात आल्यामुळे निधी खर्चाचा वेग कायम राखण्यात मदत झाली.
यासोबतच महसूल वसुलीच्या बाबतीत जिल्ह्यासाठी निर्धारित ११६ कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ११८ कोटी रुपयांची प्रत्यक्ष वसुली करण्यात आली असून उद्दिष्टापेक्षा जास्त कामगिरी नोंदविण्यात आली आहे.
