सिरोंचा (प्रतिनिधी) दिनांक 13 एप्रिल 2026
आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सिरोंचा पोलिसांनी सज्जता दाखवत शहरात भव्य रूट मार्च काढला. सोमवार, दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी पोलीस स्टेशन सिरोंचा यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
या रूट मार्चचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक तथा प्रभारी अधिकारी मारुती नंदे यांनी केले. पोलीस स्टेशन सिरोंचा येथून सुरू झालेला हा मार्च शिवाजी चौक, बस स्टॉप चौक, एकता चौक, जागृती चौक, बँक ऑफ इंडिया परिसर, बाजारवाडी मार्गे पुन्हा बस स्टॉप चौक व शिवाजी चौक असा मार्गक्रमण करत पोलीस स्टेशन येथे समाप्त झाला. संपूर्ण शहरात पोलिसांची ठोस उपस्थिती जाणवून देत नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात आली.
याच अनुषंगाने दंगा काबू योजनेची रंगीत तालीमही घेण्यात आली. सायंकाळी 5:10 वाजता सुरू झालेली ही तालीम 6:55 वाजता संपन्न झाली. या सरावातून संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची तत्परता आणि समन्वय कौशल्यांची चाचणी घेण्यात आली.
या उपक्रमात पोलीस स्टेशन सिरोंचा येथील 5 अधिकारी व 35 अंमलदार, तसेच SRPF चे 8 पोलीस अंमलदार व 20 जवान सहभागी झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली PSI मारुती नंदे, PSI प्रवीण सोनवणे, PSI नरेंद्र वंगाटे, PSI कुलकर्णी मॅडम आणि PSI जक्कन मॅडम यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.
सिरोंचा पोलिसांच्या या उपक्रमामुळे आंबेडकर जयंती शांततेत आणि उत्साहात पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनीही पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
– विदर्भ न्यूज 24
