गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक 13 एप्रिल 2026
गडचिरोली जिल्ह्यात मका पिकाच्या पेरणी क्षेत्रात गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ होत असून, रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये हे क्षेत्र तब्बल १३,१५५ हेक्टरवर पोहोचल्याचा खुलासा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली यांनी केला आहे.
जिल्ह्यातील मका पिकाच्या क्षेत्रासंदर्भात काही माध्यमांमध्ये अपूर्ण माहिती प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने वास्तव परिस्थिती स्पष्ट केली आहे. संबंधित आकडेवारीत नमूद केलेले २७३ हेक्टर हे केवळ उन्हाळी हंगाम २०२५-२६ मधील क्षेत्र असून, गडचिरोली जिल्ह्यात मका पिकाची प्रमुख पेरणी रब्बी हंगामात केली जाते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात मका पिकाचे सरासरी क्षेत्र ४,०८४ हेक्टर इतके आहे. मात्र, रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये हे क्षेत्र ९,०५० हेक्टर होते, तर चालू रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये ते वाढून १३,१५५ हेक्टर झाले आहे. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत ४,१०५ हेक्टरची लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. सध्याचे पेरणी क्षेत्र हे सरासरीच्या तुलनेत तब्बल ३२२ टक्के असल्याचेही विभागाने नमूद केले आहे.
तसेच खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगाम २०२५-२६ या तिन्ही हंगामांतील मका पिकाचे एकत्रित पेरणी क्षेत्र १४,०५८ हेक्टर इतके असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावरून जिल्ह्यात मका पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढता कल दिसून येत आहे.
मका पीक प्रधान मंत्री पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक अटी पूर्ण करण्याच्या दृष्टीनेही कृषी विभाग प्रयत्नशील आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एखाद्या महसूल मंडळात किंवा तालुक्यात सलग तीन वर्षे किमान ३,००० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने मका पिकाचा क्षेत्रविस्तार वाढविण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत.
एकूणच, जिल्ह्यात मका पिकाच्या क्षेत्रात होत असलेली सातत्यपूर्ण वाढ ही कृषी क्षेत्रातील सकारात्मक बदलाचे द्योतक ठरत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठीही ही बाब महत्त्वाची ठरत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.
