गडचिरोली विदर्भ न्यूज-24 नेटवर्क दिनांक 21 मे 2026
गडचिरोली जिल्ह्यात बनावट चलनी नोटांचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून गडचिरोली पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत या टोळीचा पर्दाफाश केला आहे. बँकेच्या एटीएम डिपॉझिट मशीनमध्ये जमा झालेल्या बनावट नोटांमुळे या प्रकरणाचा उलगडा झाला असून पोलिसांनी चार आरोपींना अटक करत तब्बल ३९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिनांक १५ मे २०२६ रोजी बँक ऑफ महाराष्ट्र, गडचिरोली शाखेचे व्यवस्थापक प्रतिक बाबाराव अनासने यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. एटीएम डिपॉझिट मशीनमध्ये जमा झालेल्या काही नोटा संशयास्पद वाटल्याने तपास करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ११ मे रोजी प्रमोद टिकाराम कोवे (वय २३, रा. हळदा, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) याने १०० रुपयांच्या २१ बनावट नोटा एटीएममध्ये जमा केल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर पोलिसांनी प्रमोद कोवे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने या नोटा आदित्य जनार्धन रेचनकर (वय १९, रा. राम मंदिर परिसर, आरमोरी रोड, गडचिरोली) याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. पुढील चौकशीत आदित्य हा नागपुरातील ‘चिटू’ नावाच्या व्यक्तीकडून बनावट नोटा आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या धाग्यादोऱ्यावरून गडचिरोली पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे संयुक्त पथक तात्काळ नागपुरात रवाना झाले. तांत्रिक विश्लेषण आणि आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्रिमूर्ती नगर परिसरातील एका फ्लॅटवर छापा टाकण्यात आला. या छाप्यात पोलिसांना बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारा हायटेक एचपी कलर प्रिंटर, बॉण्ड पेपर, कटर, अर्धवट छापलेल्या नोटा तसेच मोठ्या प्रमाणात बनावट चलनी नोटांचे साहित्य आढळून आले.
या प्रकरणात मयुर लक्ष्मीकांत डोईजळ (वय ३१), आदित्य लक्ष्मीकांत डोईजळ (वय २६) आणि आदित्य जनार्धन रेचनकर (वय १९) या आरोपींना अटक करण्यात आली. सर्व आरोपींना २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण करत आहेत.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये १०० रुपयांच्या बनावट नोटा, ५० व २०० रुपयांच्या अर्धवट छापलेल्या नोटांचे पान, एचपी कलर प्रिंटर, बॉण्ड पेपर, कटर, स्केल आणि नोटा छपाईसाठी लागणारे साहित्य यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे काही नोटा एका बाजूला १०० तर दुसऱ्या बाजूला २०० किंवा ५० रुपयांच्या स्वरूपात छापण्यात आल्याचेही समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी. तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण फेगडे आणि पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.
“एटीएममधील एका संशयास्पद नोटेमुळे उघड झाला संपूर्ण बनावट नोटांचा कारखाना”
गडचिरोली पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील आर्थिक फसवणुकीच्या नव्या पद्धतीवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
