गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक 21 मे 2026
गडचिरोलीहून उमरखेडकडे निघालेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बस गुरुवारी सकाळी मृत्यूचा सापळा ठरली. गडचिरोली शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर नवेगाव-मुरखळा परिसरातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव बसने लोखंडी सुरक्षा कठडा तोडला आणि थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पलटी घेतली. काही क्षणांत प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला.
या भीषण अपघातात ७ महिन्यांच्या निष्पाप बालकासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३३ प्रवासी जखमी झाले आहेत. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मृतांमध्ये ख्वाजा शाहबुद्दीन (६०, देसाईगंज), लक्ष्मीबाई दुरकीवार (५५, नवरगाव) आणि उपचारादरम्यान मृत्यू झालेला शिवांश नवघरे (७ महिने) यांचा समावेश आहे. सात महिन्यांच्या चिमुकल्याच्या मृत्यूने संपूर्ण जिल्हा हळहळला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बसचा वेग जास्त होता. वळणावर अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि काही सेकंदांतच बस रस्त्याबाहेर जाऊन पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की बसमधील अनेक प्रवासी एकमेकांवर आदळले. महिलांसह लहान मुलांनाही गंभीर दुखापती झाल्या.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी जीवाची पर्वा न करता प्रयत्न केले. काही वेळातच पोलिस आणि आरोग्य विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य वेगाने सुरू केले.
या दुर्घटनेत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाल यांच्या पत्नी ज्योती पाल या गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गडचिरोलीतील प्रतिष्ठित नागरिक डॉ. गणेश जैन हे देखील बसमध्ये प्रवास करत होते.
जखमींमध्ये धनश्री चांदेकर, आशिष साखरकर, मायाबाई कांबळे, संगीता कांबळे, श्रीहरी खळकर, बेबीबाई खळकर, चैतन्य मेडीवर, तानिया मेडीवर, वैशाली माडेवार, रुपाली खणके, ललिता खणके, ऋषभ खडके, सचिन वाळके, जयश्री वरभे, रत्नाकर राऊत, पार्थ राऊत, मंगला कळसकर, भूषण दुरकीवार, चालक रोहित देशमुख, वाहक संदीप पवार, विकी शेंडे, तारा साबळे, श्वेता नवघरे, सुमन कत्तलवार, व्यंकट ढगे, अश्विनी तोरपे, किशोर गावतुरे, गौरव कुमरे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
अपघातानंतर चालक रोहित देशमुख याने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीत, “नेमके काय झाले हे समजले नाही,” असे सांगितल्याचे समोर आले आहे. तर वाहक संदीप पवार तिकीट वितरणात व्यस्त असल्याने अपघातापूर्वीची परिस्थिती त्यालाही स्पष्ट सांगता आली नाही.
दरम्यान, परिवहन विभागाच्या प्राथमिक तपासात अपघातग्रस्त बस नवीन आणि तांत्रिकदृष्ट्या सुस्थितीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अतिवेग, निष्काळजी वाहनचालकता किंवा वळणावरील नियंत्रण गमावणे ही अपघातामागील संभाव्य कारणे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे.
घटनेची माहिती मिळताच गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे तसेच माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी सामान्य रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली. गंभीर रुग्णांना तातडीने विशेष उपचार मिळावेत, अशा सूचना त्यांनी डॉक्टरांना दिल्या.
यावेळी त्यांनी एसटी प्रशासनाशी चर्चा करत ग्रामीण भागातील बससेवा अधिक सुरक्षित करण्याची गरज अधोरेखित केली. चालकांचे नियमित प्रशिक्षण, बसची तांत्रिक तपासणी आणि धोकादायक मार्गांवर अतिरिक्त सुरक्षा उपाय आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, डॉ. मनीष मेश्राम, डॉ. धुर्वे, डॉ. निलकमल मेश्राम यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यावर शोककळा पसरली असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गावागावातून मृतांना श्रद्धांजली वाहिली जात असून अपघातासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
